Sanjay Raut alleges that Ravindra Dhangekar left Congress because of allegations against his wife
पुणे : मुंबईच्या धरतीवर पुणेशहरातील ५०० चौ.फूटांपर्यंतच्या सदनिकांचा मिळकत कर रद्द करावा, अशी मागणी कॉंग्रेस महाविकास आघाडीचे कसबा मतदारसंघाचे आमदार रविंद्र धंगेकर यांनी मुख्ममंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
आमदार रविंद्र धंगेकर यांनी राज्य शासनाने पुणेकरांना मिळत असलेली मिळकत करातील ४० टक्के सवलत पुर्ववत करणार, शनिवार वाडा परिसरातील जुन्या वाड्यांच्या पुर्नबांधणीला परवानगी मिळावी तसेच मुंबईच्या धरतीवर ५०० चौ. फूटांपर्यंतच्या निवासी मिळकतींचा मिळकत कर माफ करावा यासाठी प्रयत्न करणार असल्याचे कसबा विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारात आश्वासन दिले होते. दोन महिन्यांपुर्वी कसबा निवडणुकीमध्ये विजयी झाल्यानंतर पहिल्या दिवसांपासून त्यांनी या प्रश्नांचा पाठपुरावा सुरु केला आहे. त्यापैकी मिळकत करातील ४० टक्के सवलत पुर्ववत करण्याचा निर्णय राज्य शासनाने मान्य देखिल केला असून त्याची अंमलबजावणी देखिल होत आहे.
यासोबतच शनिवार वाडा ही हेरीटेज वास्तू असल्याने केंद्र शासनाच्या नियमानुसार शनिवार वाड्याच्या १०० मी. परिसरात बांधकामांना बंदी असल्याने येथील धोकादायक जुन्या वाड्यांचा प्रश्न आणखीनच गंभीर झाला आहे. या पार्श्वभूमीवर धंगेकर यांनी राज्यातील ४८ खासदारांसोबतच, केंद्रीय पुरातत्व विभाग, केंद्रीय नगरविकास विभाग आणि संबधित विभागांना पत्र पाठवून या प्रश्नाची सोडवणूक करण्याचे आवाहन केले आहे. तसेच विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये मुंबईच्या धरतीवर पुणे शहरातील ५०० चौ.फुटांपेक्षा कमी क्षेत्रफळ असलेल्या निवासी मिळकतींचा कर माफ करण्याची मागणी केली होती. तिचा पाठपुरावा करण्यासाठी नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवत पाठपुरावा सुरू केला आहे.