संजय राऊतांची राज ठाकरेंवर टीका
मुंबई: “महापालिका निवडणुकीपूर्वी भाजप मनसेला सोबत घेऊ शकते. लोकसभेतील कामगिरीबद्दल मनसेला रिटर्न गिफ्टही मिळू शकते. भाजप राज ठाकरेंच्या पक्षाला कौन्सिलची जागा देऊ शकते, अशी चर्चा आहे. मात्र मनसे-भाजप युतीच्या वृत्तावर उद्धव गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. राज ठाकरे हे भाजपच्या हातातले खेळणे आहे आणि भाजप राज ठाकरेंशी खेळत राहते,” अशी जहरी टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा दारूण पराभव झाला. मनसेला एकही जागा जिंकता आली नाही. त्यानंतर मनसे नेत्यांनी भाजपला पाठिंबा देऊन चूक केल्याची खंतही व्यक्त केली. पण आता महापालिका निवडणुकीत मनसेला सरकारमध्ये सामील करून घेण्याबाबत खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठे विधान केले आहे. मनसेला सरकारमध्ये सामील करून घेण्याची आमची इच्छा असल्याचे फडणवीसांनी म्हटलं आहे. राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांच्या विरोधात लढूनही त्यांना चांगली मते मिळाली. त्यांच्या अनेक उमेदवारांना चांगली मते मिळाली. त्यांची आणि आमची मते बऱ्याच प्रमाणात जुळतात. त्यांना सरकारमध्ये सामील करून घेण्याची आमची इच्छा आहे.
महापालिका निवडणुकीत राज ठाकरेंच्या मनसेला भाजप सत्तेत घेणार का? देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य
फडणवीस म्हणाले की, “राज्यात लवकरच महापालिका निवडणुकांची घोषणा होईल. महापालिका निवडणुकीत शक्य असेल तिथे त्यांना सोबत घेण्याचा आम्ही विचार करत आहोत. राज ठाकरे यांना सरकारसोबत ठेवण्यासाठी आम्ही सकारात्मक आहोत, त्यांचे आणि आमचे विचार जुळतात. लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी आम्हाला उघडपणे पाठिंबा दिला होता. याचा आम्हाला फायदा झाला आहे.”
याआधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील मैत्रीचे किस्से सर्वांनी पाहिले आणि ऐकले आहेत. देवेंद्र फडणवीस नेहमी राज ठाकरें यांच्या शिवतीर्थावर त्यांना भेटण्यासाठी जात असतात.तर राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नियमित भेटीगाठीही होत असतात. राज ठाकरे हे आमचे मित्र आहेत आणि त्यांनी हिंदुत्व स्वीकारल्यापासून मनसे वैचारिकदृष्ट्या आमच्यासोबत असल्याचही फडणवीसांनी म्हटलं आहे.
हिवाळ्यात ड्राईव्ह करताना जर कारच्या विंडशिल्डवर साचत असेल धुकं, तर वेळीच करा
महायुतीसोबत सरकारमध्ये सामील होण्याच्या प्रश्नाबाबत मनसे नेत्यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. महायुतीविरोधात आमची भूमिका कधीही नव्हती. आम्ही नेहमीच एकला चलोचा नारा दिला आहे. आता निवडणुका संपल्या आहेत, त्यामुळे राज ठाकरे जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल, असे काही मनसे नेत्यांचे म्हणणे आहे.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीत मनसेने महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्यावेळी मनसे महायुतीसोबत येणार असल्याची चर्चा होती. आता महापालिका निवडणुकीत मनसेही भाजपसोबत येण्याबाबत सकारात्मक असल्याचे वृत्त आहे. त्याचे कारण म्हणजे गेल्यावेळी झालेल्या बैठकीतही मनसेच्या नेत्यांनी राज ठाकरेंनी भाजपच्या पाठीशी उभे राहून भविष्यातील लढाई लढण्याची भूमिका मांडली होती.