
...म्हणून थांबला असेल 'लाडकी बहीण'चा हफ्ता; तुम्ही देखील 'ही' चूक केली का?
मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना राज्यातील महिलांसाठी चांगलीच फायद्याची ठरताना दिसत आहे. महाराष्ट्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘लाडकी बहिण’ योजनेतून अनेक महिलांना वगळण्यात आले आहे. काही महिलांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करूनही त्यांना अनुदानाचा हफ्ता अद्याप मिळालेला नाही. त्यामुळे महिलांची निराशा झाली आहे. आता यावर राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे.
लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या ऑनलाईन ई-केवायसी प्रक्रियेने राज्यभरात महिलांची डोकेदुखी वाढवली. त्यातच जानेवारी महिन्यात अनेक महिलांना पैसेच मिळाले नाही. ई-केवायसी करताना त्रुटी राहिल्यामुळे पैसे जमा झाले नसल्याचे समोर आले आहे. महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी आता ई-केवायसी करताना झालेल्या चुका दुरूस्त करण्याबाबत महिलांना माहिती दिली.
हेदेखील वाचा : ‘आम्हाला अनुदानाचे थकित हफ्ते मिळणार तरी कधी?’ लाडक्या बहिणींची सरकारला हाक
मंत्री तटकरे म्हणाल्या, ‘महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी, त्यांच्या आरोग्य व पोषणामध्ये सुधारणा करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवण्यात येत आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व लाभार्थ्यांना ३१ डिसेंबरपर्यंत ई-केवायसी करण्याची मुदत देण्यात आली होती. परंतु, काही कारणास्तव ई-केवायसी करताना चुकीचा पर्याय निवडण्याची बाब निदर्शनास आली आहे. त्यामुळे योजनेच्या निकषांनुसार या लाभार्थी महिलांची क्षेत्रीय स्तरावर अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष पडताळणी करण्याच्या सूचना सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत’.
पोर्टलवर तक्रार करूनही दखल नाहीच
लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आत्तापर्यंत अनेक महिलांना लाभ मिळाला आहे. मात्र, सध्या ई-केवायसी करूनही अनेक महिलांना अनुदानापासून वगळण्यात आले आहे. त्यात सरकारच्या अधिकृत पोर्टलवर त्यासंबंधी तक्रार करूनही कोणतीही दखल अथवा प्रतिसाद दिला जात नसल्याच्या तक्रारीही समोर आल्या आहेत. त्यामुळे महिलांना अनुदान नेमके कोणत्या कारणास्तव थांबवण्यात आले, याची माहिती मिळू शकत नाही. परिणामी, हजारो बहिणींच्या अडचणीत वाढ झाली आहे.
हजारो महिला संतप्त
हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महिलांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या. आपला हप्ता खात्यात जमा झाला आहे की नाही, केवायसी पूर्ण आहे की अडचणीत आहे, याची चौकशी करण्यासाठी शेकडो महिला सकाळपासून कार्यालयात ठाण मांडून होत्या. कोणतीही पूर्वपरवानगी न घेता काढण्यात आलेल्या या मोर्चामुळे काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले.
हेदेखील वाचा : PMC Elections 2026 : लाडक्या बहिणींच्या हातात हप्ता अन् मनात प्रश्न! महिला मतदार कुणाच्या पारड्यात?