पुणे : “झाडे ही आपल्याला ऑक्सिजन देणारी बँक आहे. या बँकेत प्रत्येकाने किमान सहा-सात झाडे लावून त्याचे संगोपन करत ही बँक समृद्ध करावी. पर्यावरण दिनाच्या उत्सवात सर्वत्र वृक्षारोपण होते. मात्र, या लावलेल्या झाडांचे संगोपन करणे अधिक गरजेचे आहे,” असे मत माजी केंद्रीय पर्यावरण मंत्री खासदार प्रकाश जावडेकर यांनी केले. यापुढे ‘झाडे लावा झाडे वाढवा’ असा नारा द्यावा, असेही त्यांनी सांगितले.
लायन्स क्लब ऑफ पुणे इको फ्रेंड्सच्या पुढाकारातून लायन्स क्लब ऑफ इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३२३४ डी २ व राज्याच्या वन विभाग आणि ट्रायडंट सर्व्हिस यांच्या संयुक्त विद्यमाने वारजे येथील वनउद्यानात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी जावडेकर यांच्या हस्ते आंब्याचे झाड लावून उपक्रमाचे उद्घाटन झाले. आंबा, सागरगोटे अशी एकूण १५०० झाडे येथे लावण्यात येणार असून, त्यातील १०० झाडे रविवारी लावण्यात आली. उर्वरित झाडे जुलैमध्ये लावली जाणार आहे.
प्रसंगी लायन्स क्लबचे प्रांतपाल हेमंत नाईक, प्रधान वनसंरक्षक जीत सिंग, भाजपचे संदीप बुटाला, लायन्स क्लबचे सदस्य सतीश राजहंस, संयोजक अनिल मंद्रुपकर, किशोर मोहोळकर, सौरभ सूर्यवंशी यांच्यासह धनकवडी येथील भारती विद्यापीठ इंग्लिश हायस्कुल व किरकटवाडी येथील ज्ञानज्योती विद्यामंदिर शाळेतील विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.
प्रकाश जावडेकर म्हणाले, “वृक्षारोपण खरे तर जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून व्हायला हवे. कारण त्यावेळी मातीमध्ये ओलावा असतो. झाडे लावण्याचा केवळ कार्यक्रम न होता, ती जगली आणि वाढली पाहिजेत, यावर आपण काम करावे. भविष्यात स्वच्छ ऑक्सिजन मिळावा, हवेत गारवा राहावा आणि निसर्गाचे चक्र कायम राहावे, यासाठी झाडे लावण्याची गरज आहे. शाळांमधून ‘स्कुल नर्सरी’सारखे उपक्रम प्रभावीपणे राबवायला हवेत.”
[read_also content=”पुण्यात आंतरराष्ट्रीय दिव्यांगांच्या क्रिकेट स्पर्धेत हरियाणा संघाची बाजी https://www.navarashtra.com/maharashtra/haryana-team-wins-international-divyang-cricket-tournament-in-pune-nrdm-288971.html”]
हेमंत नाईक म्हणाले, “लायन्स क्लबच्या उद्दिष्टांमध्ये पर्यावरण रक्षण महत्वाचा उपक्रम आहे. शहरी भागात निसर्गाचा समतोल राखण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. ‘अर्बन फॉरेस्ट’, देवराई ही संकल्पना राबवत आहोत. नागरिकांचा, स्वयंसेवी संस्थांचा सहभाग आणि शासनाचे पाठबळ यातून हे उपक्रम यशस्वी होतील.”