पुणे : पुण्यामध्ये सध्या डासांनी त्यांचे साम्राज्य निर्माण केले आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. सायंकाळ झाली की सर्व घरांच्या दारं खिडक्या डासांच्या भीतीने बंद केल्या जात आहेत. शहरातील नदीकिनारच्या परिसरामध्ये देखील मोठ्या प्रमाणात डास झाले आहेत. सध्या सोशल मीडियावर मुठा नदीच्या परिसरामध्ये डासांचे लोटच्या लोट घोंगावताना दिसत आहेत. या व्हिडिओमुळे सर्व पुणेकर धास्तावले आहेत.
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडिओ पुण्यातील केशवनगर खराडीजवळील मुठा नदीवरील असल्याचे सांगितले जात आहे. नदीकिनारी बांधण्यात आलेल्या गगनचुंबी इमारतींच्या वर हे डास फिरत आहे. थोडे फार नाही तर संपूर्ण डासचे वादळ हे नदी वर दिसून येत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पुणेकरांनी चिंता व्यक्त केली आहे. पुणेकरांच्या आरोग्याच्या दृष्टीने ही बाब अत्यंत धोकादायक असून पालिकेच्या कारभारावर ताशेरे ओढले जात आहेत.
maze.pune नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये सात ते आठ डासांच्या भल्यामोठ्या रांगा आकाशात उडत आहेत. व्हायरल व्हिडिओवर पुणेकरांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. एका नेटकऱ्याने लिहिले आहे की, “हे तर नेहमीचेच आहे. व्हिडिओ फक्त आता समोर आला आहे.” तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिले आहे की, “जिकडे तिकडे फक्त इमारती झाल्या आहेत. नदी पूर्ण घाण झाली आहे. ओढे , नाले त्यामध्ये भर घालत आहेत. पालिकेचे याकडे लक्ष नाही” अशी तक्रार नेटकरी करत आहेत.