कोल्हापूर : कोल्हापुरामध्ये लोकसभा निवडणूक गाजवल्यानंतर खासदार शाहू छत्रपती सत्ताधाऱ्यांच्या विरोधात उभे राहिले आहेत. राज्य सरकारचा महत्त्वकांशी प्रकल्प म्हणून शक्तिपीठ महामार्ग ओळखला जातो. मात्र या महामार्गाला कोल्हापुरकरांची परवानगी नाही. या बहुचर्चित शक्तिपीठ महामार्ग विरोधात येत्या 18 जूनला कोल्हापुरातून विराट मोर्चा निघणार आहे. याचे नेतृत्व खासदार शाहू छत्रपती करणार आहे.
नागपूर ते गोवा असा जोडणारा शक्तिपीठ महामार्ग असणार आहे. हा महामार्ग कोल्हापुरमधून जाणार असून इतर अनेक महत्त्वांच्या शहरांना जोडणार आहे. मात्र या शक्तिपीठ महामार्गाबाबत कोल्हापूरकर आक्रमक झाले आहेत. या शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात या मोर्चाला इंडिया आघाडीच्या वतीने पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे. कोल्हापुरच्या शासकीय विश्रामगृहात खासदार शाहू छत्रपती, आमदार ऋतुराज पाटील यांच्यासह इंडिया आघाडीच्या घटक पक्षांनी उपस्थिती लावत या महामार्गाला तीव्र विरोध दर्शवला आहे.
महामार्गाला विरोध का?
शक्तीपीठ महामार्ग हा नागपूर ते गोवा असा एकूण 805 किलोमीटरचा असणार आहे. या मार्गासाठी राज्य सरकारने भूसंपादन करण्यास सुरुवात केली आहे. मात्र या शक्ती पीठ महामार्गामध्ये राज्यातील 27 हजार हेक्टर जमिनीचं नुकसान होणार आहे. यामध्ये प्रामुख्याने पिकाऊ जमीनीचा समावेश आहे. त्यामुळे या महामार्गाला इंडिया आघाडीच्या वतीने तीव्र विरोध करण्यात आला आहे. या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचा आवाहनही करण्यात आले आहे.
काय आहे शक्तीपीठ महामार्ग?
शक्तीपीठ महामार्ग हा नागपूर ते गोवा असा जोडणार तब्बल 805 किलोमीटरचा महामार्ग असणार आहे. या प्रकल्पाचा अंदाजे 86,000 कोटी इतका खर्च येण्याची शक्यता आहे. हा महामार्ग वर्धा, यवतमाळ, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यातून हा जाणार आहे. यासाठी तब्बल 27 हजार एकर जमीन संपादित केली जाणार आहे. या शक्तीपीठ महामार्गामुळे नागपूर ते गोवा प्रवास केवळ 11 तासांमध्ये होणार असून यामुळे वाहनचालकांचे 21 तास वाचणार आहेत. हा महामार्ग 22 जिल्ह्यातील देवस्थानांना जोडणार आहे. म्हणूनच या महामार्गाला शक्तीपीठ महामार्ग नाव देण्यात आले आहे. या महामार्गामुळे शक्तीपिठाला भेट देणाऱ्या भाविकांची संख्या वाढणार असून परिणामी पर्यटनाला चालना मिळणार आहे.