
यावेळी मतदार जागृती मोहिमेच्या फलकाचे अनावरणही करण्यात आले. या चर्चासत्रात प्रसाद कुलकर्णी, रमेश लवटे, पांडुरंग पिसे, राजन मुठाणे, बजरंग लोणारी, शिवाजी शिंदे, उज्ज्वला जाधव, संदीप चोडणकर, अन्वर पटेल, किरण कटके, अजित मिणेकर, शकील मुल्ला, महेंद्र जाधव, बाळासाहेब नरशेट्टी, महादेव मिणची, विनोद जाधव, नितेश घोडके, जतिन पोतदार आदींनी सहभाग घेतला.
निवडणूक व्यक्ती केंद्रित अथवा उमेदवार केंद्रित नको तर मतदार केंद्रित असली पाहिजे
या चर्चासत्रातून असेही मत व्यक्त करण्यात आले की, आपले मत आपण डोळस पणे दिले पाहिजे. निवडणूक व्यक्ती केंद्रित अथवा उमेदवार केंद्रित नको तर मतदार केंद्रित असली पाहिजे. उमेदवारांकडून त्यांचा जाहीरनामा मागून घेऊन त्याच्या तुलनात्मक विचार करून मत दिले पाहिजे. आपण स्वतः व आपले कुटुंबही मताच्च्या बदल्यात कोणाकडे काहीही मागणार नाही याची खात्री स्वतःच स्वतःला देऊन आपला मताचा अधिकार आपण निर्भयपणे बजावला पाहिजे.
संविधानातील मूल्यांचा आदर करणाऱ्या उमेदवाराला मत दिले पाहिजे
सामाजिक आर्थिक राजनैतिक न्याय, विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता, लोकांचे सार्वभौमत्व, लोकशाही, समाजवाद, धर्मनिरपेक्षता राष्ट्रीय एकात्मता आदी संविधानातील मूल्यांचा आदर व जोपासना करणाऱ्या उमेदवारांना मत दिले पाहिजे. या चर्चासत्रामध्ये निवडणूक कायद्यात सुधारणा होणे गरजेचे आहे, हेही स्पष्ट करण्यात आले.