sanjay raut target pm modi over one nation one election
मुंबई : महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणूक लवकरच पावर पडणार आहे. मात्र मागील 15 वर्ष हरियाणासोबत महाराष्ट्राची निवडणूक होत असताना देखील निवडणूक आयोगाकडून कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला नाही. निवडणूक आयोगाकडून फक्त हरियाणा व जम्मू काश्मीर या दोन राज्यांची निवडणूक जाहीर केली. यामुळे महाविकास आघाडीचे नेते नाराज झाले असून रोष व्यक्त करत आहेत. भाजप श्रेष्ठींना सांगून मुद्दाम असे केल्याचा आरोप देखील काही नेते करत आहेत. दरम्यान, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. ‘वन नेशन वन इलेक्शन’च्या घोषणा करणाऱ्यांना चार राज्यांच्या निवडणुका घेता आल्या नाहीत असा टोला खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.
काय म्हणाले संजय राऊत?
खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी निवडणूक आयोगासह महायुतीवर निशाणा साधला. निवडणूक जाहीर न केल्यामुळे टीकास्त्र डागले. संजय राऊत म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरून छाती पुढे करून सांगतात वन नेशन वन इलेक्शन विचार करु. मात्र ते चार राज्यातल्या निवडणुका देखील एकत्र येऊ शकत नाहीत. झारखंड, हरियाणा, जम्मू काश्मीर, महाराष्ट्र फक्त चार राज्याच्या निवडणूका जे सरकार एकत्र घेऊ शकत नाही. ते वन नेशन वन इलेक्शनच्या घोषणा करत आहेत. तुम्ही मोठे आले चला सोडून द्या. खोटारडे कुठले, लोकांना मूर्ख बनवत आहेत. लाल किल्ल्यावरून खोटं बोलणारा प्रधानमंत्री आहे. यांना महाराष्ट्रात तुम्हाला हरण्याची भीती आहे. झारखंडमध्ये तुम्हाला हरण्याची भीती आहे म्हणून तुम्हाला जास्त वेळ हवा आहे म्हणून तुम्ही या दोन राज्यांना निवडणुका घ्यायला तयार नाही. तुम्हाला लाज म्हणून लाडकी बहीण योजनेच्या अजून एक हप्ता महिलांना द्यायचा आहे, अशी घणाघाती टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
हे खिशातून पैसे देत नाहीत
लाडकी बहीण योजना राज्यामध्ये सर्वत्र गाजते आहे. अवघ्या काही वेळात लोकप्रिय झालेली ही योजना महायुतीसाठी टर्निंग पॉईंट ठरेल का असा सवाल संजय राऊत यांना विचारण्यात आला. यावर उत्तर देताना खासदार राऊत म्हणाले, असे अजिबात नाही. कदाचित तो न्यूटन ठरेल. त्यांच्यासाठी टर्निंग पॉईंट असं काही नाही. अशा प्रकारच्या खूप योजना महाराष्ट्र सरकारने राबवल्या आहेत. ते काय नवीन योजना नाही. त्यांनी काय मोठी फार मोठी क्रांती केली नाही. महिलांसाठी अशा अनेक योजना यापूर्वी आलेल्या आहेत. फडणवीस, अजित पवार आणि मिंदे दीड हजार रुपये काही खिशातले देत नाहीत. लोकांच्या करातला पैसा आहे या योजनेचा लाभ महिलांनी घेतला पाहिजे. आमचं सरकार येईल तेव्हा पंधराशे ऐवजी आम्ही 3000 करू हा आमचा शब्द आहे, असा शब्द संजय राऊत यांनी दिला.
महायुती हे आत्ताचे घाशीराम कोतवाल
त्याचबरोबर उपमुख्यमंत्री व भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील संजय राऊतांनी गंभीर टीका केली. संजय राऊत म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांना फार गांभीर्याने घेण्याची गरज नाही. ज्या पद्धतीने पेशव्यांचे राज्य चालू होते शेवटच्या काळात पुण्यात त्या पद्धतीने सध्या फडणवीस आणि त्यांचे लोक काम करत होते. अनागोंदी, अराजक, लुटमार करत होते. तसेच हे तीन सर्व घाशीराम कोतवाल आहेत. या तीन घाशीराम कोतवाल यांच्या हातामध्ये महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रात जे सुडाच राजकारण आहे ते फडणवीस यांनी सुरू केले आणि आम्ही त्यांच्यामध्ये नाही. आम्ही त्या पद्धतीचे राज्यकर्ते नाही. त्यांना भीती का? राज्य जाईल ही त्यांची भीती आहे. ते हारतील म्हणून ते लोकांना देवेंद्र फडणवीस धमक्या देत आहेत. बाकी त्यांचे इतर दोन जे पार्टनर आहेत त्यांच्याविषयी काही बोलण्यात अर्थ नाही. पण देवेंद्र फडणवीस जे पडद्यामागून कपटकारस्थान करत आहेत आणि महाराष्ट्र ते उघड्या डोळ्याने पाहत आहे, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली आहे.