
गौतम अदानी माझ्यासाठी भाऊच; मी हक्काने त्यांना...; खासदार सुळेंकडून तोंडभरून कौतुक
या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, अदाणी समूहाच्या सामाजिक उपक्रमांच्या प्रमुख प्रीती अदाणी, खासदार सुनेत्रा पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
३० वर्षांच्या जिव्हाळ्याच्या नात्याची आठवण
खासदार सुळे म्हणाल्या की, अदाणी कुटुंबासोबत आमचे गेल्या ३० वर्षांपासूनचे जिव्हाळ्याचे नाते आहे. गौतमभाई आणि प्रीती वहिनी माझ्यासाठी मोठा भाऊ आणि मोठी वहिनी आहेत. माझ्या आयुष्यातील आनंदाची किंवा कडू बातमी मी ज्या भावाला सांगते, तो गौतमभाईच असतो. हे नातं केवळ औपचारिक नसून, प्रेम आणि विश्वासावर उभं आहे. गौतम अदाणी हे केवळ देशातच नव्हे, तर जागतिक पातळीवर यशस्वी उद्योजक ठरले असून, त्यांचा मला अभिमान आहे. त्यांचा संघर्ष आम्ही कुटुंब म्हणून फार जवळून पाहिला आहे. त्यांच्या यशाचे मोठे श्रेय त्यांच्या पत्नी प्रीती अदाणी यांना जाते. कुटुंब सांभाळून, मुलांना चांगले संस्कार देत शांत आणि संयमी भूमिका निभावणाऱ्या प्रीती वहिनींचे योगदान अतिशय महत्त्वाचे आहे, असेही सुळे यांनी नमूद केले.
शरद पवार यांच्याकडून गौतम अडाणी यांच्या कार्याचा गौरव
खासदार शरद पवार यांनीही यावेळी गौतम अदाणी यांच्या उद्योग क्षेत्रातील कामगिरीचे कौतुक केले. गुजरातमधील दुष्काळी भागातील एका खेडेगावातून मुंबईपर्यंतचा त्यांचा संघर्ष प्रेरणादायी आहे. सुरुवातीला कोणताही आधार नसताना जिद्द, कष्ट आणि दूरदृष्टीच्या जोरावर त्यांनी स्वतःचे साम्राज्य उभे केले. आज देशातील २३ राज्यांमध्ये अदाणी समूहाचे विविध प्रकल्प कार्यरत असून, लाखो लोकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. बंदरे, वीज निर्मिती, विमानतळ उभारणी अशा विविध क्षेत्रांत अदाणी समूहाचे मोठे योगदान असल्याचे पवार यांनी सांगितले.