
अरे देवा! 'ट्रेन निघून गेली...', लोकलने प्रवास करण्यापूर्वी वाचा महत्त्वाची अपडेट; वेळा, मार्ग अन् थांब्यांत बदल; जाणून घ्या नवे वेळापत्रक
पश्चिम रेल्वे मार्गावर सध्या दररोज १,४१४ उपनगरीय लोकल फेऱ्या चालवल्या जातात. नवीन वेळापत्रक लागू झाल्यानंतरही एकूण फेऱ्यांची संख्या १,४१४ इतकीच राहणार आहे. प्रवाशांची मागणी आणि गर्दी लक्षात घेऊन ६ नवीन लोकल फेऱ्या सुरू केल्या जात आहेत. त्याचवेळी सध्या चालवल्या जाणाऱ्या ६ जुन्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.
नवीन वेळापत्रकात वातानुकूलित लोकल प्रवाशांनाही दिलासा मिळणार आहे. पश्चिम रेल्वेवरील एसी लोकलच्या फेऱ्यांची संख्या १४५ वरून १४७ करण्यात आली आहे. चर्चगेट आणि बोरिवलीदरम्यान दोन नवीन एसी फेऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यापैकी एक एसी लोकल चर्चगेटहून संध्याकाळी ५.२८ वाजता सुटेल, तर दुसरी बोरिवलीहून संध्याकाळी ६.२४ वाजता रवाना होईल.
भाईंदर ते विरार प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी सकाळच्या वेळेत एक नवीन सेवा उपलब्ध होणार आहे. ही लोकल भाईंदरहून सकाळी ७.४६ वाजता सुटेल आणि सकाळी ८.१२ वाजता विरारला पोहोचेल. त्याशिवाय बोरिवली ते भाईंदर आणि विरार मार्गावर रात्री उशिराच्या लोकल सेवा सुरू करण्यात येणार आहेत.
वांद्रे ते चर्चगेट मार्गावरही नवीन लोकलचा पर्याय उपलब्ध करण्यात आला आहे. ही लोकल वांद्रे येथून सकाळी ११.५८ वाजता सुटणार आहे. तसेच विरार ते बोरिवली मार्गावर रात्री उशिराची लोकल सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे.
नवीन सेवा सुरू करताना पश्चिम रेल्वेने सहा जुन्या फेऱ्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये चर्चगेट-बोरिवली मार्गावरील दोन एसी फास्ट लोकल फेऱ्यांसह चार नियमित उपनगरीय फेऱ्यांचा समावेश आहे. त्यामुळे नियमितपणे या लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी बदललेले वेळापत्रक तपासणे महत्त्वाचे ठरणार आहे.
मार्गांच्या विस्तारातही महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. सध्या स्वतंत्रपणे धावणाऱ्या दादर-विरार आणि विरार-डहाणू रोड या दोन फेऱ्या एकत्र करण्यात आल्या आहेत. नव्या व्यवस्थेनुसार ही लोकल दादरहून संध्याकाळी ५.२२ वाजता सुटून पुढे डहाणू रोडच्या दिशेने धावेल. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांना थेट सेवेचा फायदा होणार आहे.
सध्या विरार ते दादरदरम्यान धावणाऱ्या दोन लोकलचा मार्ग चर्चगेटपर्यंत वाढवण्यात आला आहे. त्यामुळे दादरच्या पुढे दक्षिण मुंबईकडे प्रवास करणाऱ्यांना गाडी बदलण्याची गरज कमी होणार आहे.
नव्या वेळापत्रकात काही लोकलच्या थांब्यांमध्येही बदल करण्यात आले आहेत. चर्चगेट ते विरार मार्गावरील दोन लोकल यापुढे बोरिवली स्थानकावर थांबणार नाहीत. त्यामुळे संबंधित गाड्यांनी नियमित प्रवास करणाऱ्या बोरिवलीतील प्रवाशांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.
चर्चगेटहून बोरिवलीच्या दिशेने धावणाऱ्या एका एसी स्लो लोकलच्या सेवेतही बदल करण्यात आला असून तिच्या मार्गाबाबत प्रवाशांनी सुधारित अधिकृत वेळापत्रक तपासणे आवश्यक आहे.
१ सप्टेंबरपासून अनेक लोकलच्या वेळा, मार्ग आणि थांब्यांमध्ये बदल होत असल्यामुळे नेहमीच्या वेळेवर आणि गाडीवर अवलंबून राहण्याऐवजी प्रवाशांनी प्रवासापूर्वी सुधारित वेळापत्रक तपासावे, असे आवाहन करण्यात आले आहे. विशेषतः चर्चगेट, दादर, वांद्रे, गोरेगाव, बोरिवली, भाईंदर, विरार आणि डहाणू रोड या मार्गांवर नियमित प्रवास करणाऱ्यांनी नव्या वेळापत्रकाची नोंद घेणे महत्त्वाचे ठरणार आहे.