ठाणे : हिंदी सक्तीचा वादाने राज्याचं राजकारण चिघळताना पाहायला मिळतं. महाराष्ट्रात राहून मराठी का बोलावं वाटत नाही, किंवा मराठी शिकावसं देखील का वाटत नाही. हा सवाल उपस्थित करत आणि महाराष्ट्रात हिंदी सक्तीच्या विरोधात मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे एकत्र येत मराठी भाषेसाठी नुकताच या ठाकरे बंधूंचा विजयी मेळावा पार पडला. ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने आता राजकीय समीकरणं देखील बदलली गेली आहेत.
मुंबई येथील वरळी डोम येथे ठाकरे बंधूंनी एकत्र येत हिंदी सक्ती आदेश रद्दच्या निर्णयाचा विजयी मेळावा घेतला होता. या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना (ठाकरे) आणि मनसेच्या युती झाल्याचं शिक्कामोर्तब केला. महाराष्ट्रासाठी मराठी माणसाने एकत्र येणं गरजेचं आहे, असं मेळाव्यातील भाषणात उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यांच्या या विधानाला शिंदेंच्या युवा सेनेने व्यंगचित्रातुन प्रतिउत्तर देण्यात आले. उद्धव ठाकरे, मुंबई महापालिकेची तिजोरी आणि महापौर खुर्ची.. असे व्यंगचित्र असून त्याचे बॅनर लावत शिंदेंच्या युवा सेनेने उद्धव ठाकरे यांना डिवचले आहे.मुंबई महापालिकेची तिजोरी आणि महापौर खुर्ची यांचा व्यंगचित्रात समावेश आहे. त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांचेही व्यंगचित्र असून त्यासोबत मराठी माणसाची एकजूट अशीच राहुद्या, असा मजकूर लिहून त्यांना टोला लावण्यात आला आहे. या बॅनरच्या निमित्ताने ठाण्यात शिंदेच्या युवा सेनेने पुन्हा उद्धव ठाकरे यांना डिवचल्याचे दिसून येत आहे. यावर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी हे बॅनर काढून टाकले आहेत.
मराठी आणि अमराठीच्या मुद्दयावर ठाकरे गटाने एक सामाजिक आणि भाषिक सलोखा वाढवणारा महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. मीरा भाईंदर शहरातील पेणकरपाडा येथील प्रेमा लक्ष्मण विद्यालयात ठाकरे गटाच्यावतीने मराठी शिकवणी वर्ग सुरू करण्यात आला असून, शेकडो अमराठी नागरिकांनी यामध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला आहे.या मराठी वर्गात अमराठी बांधवांना मराठी बाराखडी, साधे संवाद, शिष्टाचार भाषाशैली आणि मराठी सण, संस्कृती यांची प्राथमिक माहिती दिली जात आहे. यामध्ये महिलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत आणि लहान व्यावसायिकांपासून स्थानिक कामगारांपर्यंत विविध घटकांचा समावेश आहे.या उपक्रमात ठाकरे गटाचे स्थानिक कार्यकर्ते आणि मराठी संघटनांचे स्वयंसेवक पुढाकार घेत असून, प्रत्येक शाखेमध्ये असे मराठी वर्ग सुरू करण्याची योजना असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.“महाराष्ट्रात राहून मराठीचा अपमान नको; मराठी ही फक्त भाषा नाही, ती संस्कृती आणि अस्मिता आहे,” असे सांगत ठाकरे गटाने मराठी प्रसाराच्या मोहिमेस सुरुवात केली आहे.