५ जुलैचा मोर्चा नाही ‘विजय सभा’ होणार; उद्धव ठाकरे
मुंबईसह महाराष्ट्राच्या राजकारणात दीर्घकाळ वर्चस्व गाजवलेली उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेना (UBT) आज एका निर्णायक वळणावर येऊन उभी राहिली आहे. एकेकाळी बृहन्मुंबई महापालिकेवर निर्विवाद सत्ता गाजवणाऱ्या शिवसेना पक्षास सध्या ओळख, नेतृत्व आणि जनाधार या तिन्ही आघाड्यांवर आव्हानांचा सामना करावा लागत आहे. विधानसभा निवडणुकीत दारूण पराभव झाल्यानंतर आगामी BMC निवडणुका फक्त पक्षाच्या प्रतिष्ठेचा प्रश्न नाही, तर त्याच्या राजकीय अस्तित्वाच्या दृष्टीनेही अत्यंत निर्णायक ठरणार आहेत.
१९९७ ते २०२२ पर्यंत शिवसेनेने सलग बीएमसीवर आपले प्रभुत्व कायम ठेवले. मात्र, मार्च २०२२ मध्ये महापालिकेच्या कार्यकाळाच्या समाप्ती नंतर प्रशासक नियुक्त केल्याने पक्षात फूट पडण्यास सुरुवात झाली. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बंडामुळे शिवसेना दोन गटांमध्ये विभागली गेली. शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील UBT गट. निवडणूक आयोगाने शिंदे गटाला शिवसेनेचे नाव आणि चिन्हही मंजूर केले.
अमेय घोले, समाधान सरवणकर, शितल म्हात्रे, यशवंत जाधव, राजू पेडणेकर, सुवर्णा करंजे आणि स्नेहल शिंदे या मजबूत स्थानिक नेत्यांसह ४३ नगरसेवकांपैकी बहुसंख्येने शिंदे यांच्या शिवसेनेत सामील झाले. यामुळे UBT गटाचा तळागाळातील संघटनात्मक बळगट खूपच कमकुवत झाला आहे. मुंबई विद्यापीठातील राजकीय तज्ज्ञ डॉ. संजय पाटील म्हणतात, “सदस्यांचा बाहेर पडणे हे केवळ राजकीय नुकसान नाही, तर संघटनात्मक हानीदेखील आहे. प्रभाग पातळीवर पक्षाचा पाया मोडला आहे.”
जुन्या कार्यकर्त्यांपासून ते बूथ पातळीवरील कार्यकर्त्यांपर्यंत संपूर्ण पक्षात सध्या गोंधळ आणि अनिश्चितता वाढली आहे, “सत्तेत नसताना नगरसेवकांना सक्रिय आणि संघटित राहणे कठीण असते. स्थानिक पातळीवर मजबूत नेतृत्वाच्या अभावामुळे कार्यकर्त्यांना गुंतवून ठेवणे जवळजवळ अशक्य झाले आहे. आम्हाला नेतृत्वापासून तुटल्यासारखे वाटते. कोणतीही स्पष्ट दिशा किंवा रणनीती दिसून येत नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांचे मनोबल खचले आहे.” अशी खंत दादर येथील एका माजी शाखाप्रमुखाने व्यक्त केली आहे.
एकेकाळी पक्षाची ऊर्जा आणि ताकद मानली जाणारी युवा सेना सध्या निष्क्रिय आणि कमजोर भासू लागली आहे. युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे हे लोकप्रिय असले तरी, कार्यकर्त्यांपासून त्यांचे निर्माण झालेले अंतर ही एक मोठी अडचणीचे ठरत आहे. “आदित्य ठाकरे फक्त निवडणुकांच्या काळात संपर्का येतात, इतर वेळी ते भेटीही देत नाही, तर शिंदे गटाचे नेते मात्र प्रत्येक स्थानिक कार्यक्रमात हजर असतात. त्यामुळे त्यांचे मैदानावरील नेटवर्क अधिक मजबूत होत आहे.” असं एका तरूणाचे म्हणणे आहे.
Top 5 Intelligence agencies in World: रहस्यांच्या दुनियेतील बादशाह आहेत या पाच गुप्तचर यंत्रणा
शिवसेनेच्या विचारधारेबाबत सध्या स्पष्टतेचा अभाव जाणवतो. पारंपरिकपणे मराठी अस्मिता आणि हिंदुत्व या दोन आधारस्तंभांवर उभा असलेला हा पक्ष, अलिकडच्या काळात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आपला सामाजिक आधार विस्तारण्यासाठी अधिक उदारमतवादी भूमिका स्वीकारू लागला आहे. या बदलामुळे पारंपरिक समर्थकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. परळ येथील एका मतदाराने सांगितले, “हिंदुत्वावर विश्वास ठेवणाऱ्या आमच्यासारख्या मराठी मध्यमवर्गीयांना आता ठाकरेंच्या सोबत राहायचं की शिंदेंसोबत – हेच कळेनासं झालं आहे.”
या सर्व अडचणी असूनही, उद्धव ठाकरे यांच्याशी सामान्य मुंबईकरांची असलेली भावनिक जवळीक पक्षासाठी महत्त्वाची ताकद आहे. माजी नगरसेवक अनिल कोकीळ म्हणतात, “कोविड काळात उद्धवजींनी जे काम केलं ते जनता विसरलेली नाही. पक्षात फूट पडली असली, तरी ठाकरे साहेबांबद्दलचा आदर आणि आत्मीयता आजही कायम आहे.”
बीएमसी निवडणुका शिवसेना (UBT) साठी केवळ राजकीय नव्हे, तर अस्तित्वाच्या लढाईसारख्या ठरणार आहेत. सध्या पक्षाला फूट, कार्यकर्त्यांतील निराशा, नेतृत्वातील मतभेद आणि वैचारिक गोंधळ अशा अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे. तरीही, उद्धव ठाकरे यांची प्रतिमा, जनतेशी असलेली भावनिक नाळ आणि काही स्पष्ट धोरणात्मक भूमिका हे पक्षासाठी सकारात्मक घटक आहेत.
पक्ष या अडचणींवर मात करून नव्या रणनीतीसह निवडणूक मैदानात उतरेल का? राज ठाकरे यांच्याशी युती शक्य होईल का? आणि सर्वात महत्त्वाचे मुंबईकर पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर विश्वास ठेवतील का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यामुळे येणारे चार महिने आणि महापालिका निवडणुका उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी अत्यंत महत्त्वाची आणि अस्तित्तवाची लढाई ठरणार आहेत मुंबईच्या राजकारणात शिवसेना (UBT) ला दुर्लक्ष करणे कोणासाठीही सोपे नाही.