अंधेरी ईएसआयसी रुग्णालय सुरू, मात्र सुविधा अपुऱ्या! पुरुष वॉर्डाची प्रतीक्षा कायम; अन्य रुग्णालयांत जाण्याची वेळ
Mumbai News: अंधेरी येथील ईएसआयसी रुग्णालयाला लागलेल्या भीषण आगीला जवळपास आठ वर्षे उलटल्यानंतर रुग्णालयाचा इन-पेशंट विभाग (आयपीडी) पुन्हा सुरू करण्यात आला आहे. मात्र रुग्णालय अद्याप पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झालेले नसल्याने रुग्णांच्या अडचणी कायम आहेत. ईएसआयसी रुग्णालयात सध्या २५ खाटांचा महिला वॉर्ड सुरू करण्यात आला असून महिला रुग्णांना दाखल करून उपचार दिले जात आहेत. मात्र पुरुष वॉर्ड अद्याप सुरू झालेला नाही. तसेच ऑपरेशन थिएटर, आयसीयू, सिटी स्कॅन आणि एमआरआय यांसारख्या महत्त्वाच्या सुविधा उपलब्ध झालेल्या नाहीत. पूर्वी रुग्णालयात सर्वप्रकारच्या अतिदक्षता सुविधा कार्यरत होत्या. सध्या या सुविधा बंद असल्याने गंभीर रुग्णांना आवश्यक उपचारांसाठी इतर ईएसआयसी रुग्णालयांकडे पाठवावे लागत आहे.(फोटो सौजन्य – AI)
Pratap Sarnaik : ‘मराठी संवाद भाषा’; अमराठी चालकांनी अभियानात सहभागी व्हावे, परिवहनमंत्र्यांचे आवाहन
रुग्णालय प्रशासनाच्या माहितीनुसार आयपीडी सेवा टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येत असून आवश्यक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुरुष वॉर्ड तसेच अतिदक्षता सुविधा सुरू करण्यात येणार आहेत. यावर्षी ३१ डिसेंबरपर्यंत आवश्यक व बहुविशेषज्ञ सेवा मोठ्या प्रमाणावर सुरू करण्याचे नियोजन असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.
रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय पाटील यांच्या माहितीनुसार, उच्चस्तरीय प्रशासकीय चर्चेनंतर ३१ मार्च २०२७पर्यंत रुग्णालय पूर्णपणे कार्यान्वित करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. त्यामुळे आठ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर रुग्णालय सुरू झाले असले, तरी सर्व वैद्यकीय सुविधा पूर्ण क्षमतेने कधी उपलब्ध होणार, हा प्रश्न अद्याप कायम आहे.
एका रुग्णाच्या नातेवाईकाने सांगितले की, रुग्णालयात दाखल होण्याची सुविधा पुन्हा सुरू झाल्याने दिलासा मिळाला आहे. मात्र शस्त्रक्रिया किंवा विशेष तपासणीची गरज भासल्यास कांदिवली येथील ईएसआयसी रुग्णालयात जावे लागत असल्याने रुग्णांची प्रचंड गैरसोय होत आहे. रुग्णालयात सध्या २५ खाटांचा महिला आयपीडी वॉर्ड, कॅज्युअल्टी, प्रयोगशाळा, ईसीजी, ओपीडी, रेडिओलॉजी आणि फार्मसी या सुविधा उपलब्ध आहेत. महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटनेचे सचिव अॅड. भिमेश मुतुला यांनी रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केल्याचे सांगितले.






