vande bharat express
मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज मुंबईतून दोन वंदे भारत एक्स्प्रेसला (Vande Bharat Express) हिरवा झेंडा दाखवला. या दोन्ही वंदे भारत एक्स्प्रेस मुंबई-सोलापूर (Mumbai -Solapur) आणि मुंबई-साईनगर शिर्डी (Mumbai-Sainagar Shirdi) या मार्गांवर धावणार आहेत. या ट्रेनमुळे प्रवाशांचा खूप वेळ वाचणार आहे. मात्र इतर ट्रेनपेक्षा या वंदे भारत एक्स्प्रेसचे तिकीट दर जास्त असणार आहेत. या दोन्ही गाड्या आठवड्यातून सहा दिवस धावणार आहेत. या गाड्यांचे वेळापत्रक आणि तिकीट दर जाणून घ्या.
मुंबई ते साईनगर शिर्डी वेळापत्रक
मुंबई-साईनगर शिर्डी वंदे भारत एक्स्प्रेस सकाळी 6.20 वाजता सीएसएमटीहून सुटणार आहे. त्यानंतर साईनगर शिर्डी येथे 5 तास 20 मिनिटांनी सकाळी 11.10 वाजता ही गाडी पोहोचेल. सीएसएमटीहून सुटणारी ही गाडी दादर, ठाणे, नाशिक रोड या स्थानकांवर थांबेल. साईनगर शिर्डी-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस साईनगर शिर्डी येथून संध्याकाळी 5.25 वाजता वंदे भारत एक्स्प्रेस सुटेल आणि 5 तास 25 मिनिटांनी ती मुंबईत रात्री 10.50 वाजता पोहोचेल. मंगळवारी मुंबई आणि शिर्डी येथून ही गाडी नसेल.
मुंबई ते साईनगर शिर्डी तिकीट दर
मुंबई-साईनगर शिर्डी वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना चेअर कार आणि एक्झिक्युटिव्ह चेअर कोचसाठी अनुक्रमे 975 रुपये आणि 1840 रुपये इतका तिकीट दर आहे. या तिकिटामध्ये केटरिंगचा देखील समावेश आहे. प्रवाशांनी ऑन-बोर्ड केटरिंगची निवड न केल्यास चेअर कार आणि एक्झिक्युटिव्ह चेअर कोचसीटसाठी अनुक्रमे 840 रुपये आणि 1670 रुपये असा तिकीटाचा दर आहे.
साईनगर शिर्डी येथून साईनगर शिर्डी-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसचे भाडे अनुक्रमे 1130 रुपये आणि चेअर कार आणि एक्झिक्युटिव्ह चेअर कोचसाठी 2020 रुपये असेल. यामध्ये केटरिंग शुल्काचाही समावेश आहे. केटरिंगशिवाय चेअर कार आणि एक्झिक्युटिव्ह चेअर कोचचे भाडे अनुक्रमे 840 आणि 1670 रुपये असणार आहे.
मुंबई ते सोलापूर वेळापत्रक
सोलापूर-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस सोलापूरहून सकाळी 6.05 वाजता सुटेल. साडे सहा तासांच्या प्रवासानंतर मुंबईत दुपारी 12.35 वाजता ही ट्रेन पोहोचेल. ही ट्रेन कुर्डूवाडी, पुणे, कल्याण आणि दादर स्थानकांवर थांबून मग सीएसएमटी स्थानकावर पोहचेल. तर मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेस सायंकाळी 4.05 वाजता सीएसएमटीवरून सुटेल आणि 6 तास 35 मिनिटांच्या प्रवासानंतर सोलापूरला रात्री 10.40 वाजता पोहोचेल. यामध्ये बुधवारी मुंबईतून ही ट्रेन नसणार आणि सोलापुरातून गुरूवारी नसणार आहे.
मुंबई ते सोलापूर तिकीट दर
मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना चेअर कार आणि एक्झिक्युटिव्ह कोचसाठी अनुक्रमे 1300 रुपये आणि 2365 रुपये इतकं तिकीट आहे. या भाड्यात केटरिंगचा समावेश आहे. केटरिंगची निवड न केल्यास चेअर कार आणि एक्झिक्युटिव्ह चेअर कोचसाठी अनुक्रमे 1010 रुपये आणि 2015 रुपये तिकीट असेल.
सोलापूर-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसचे भाडे अनुक्रमे 1150 रुपये आणि चेअर कार आणि एक्झिक्युटिव्ह चेअर कोचसाठी 2125 रुपये असेल. यामध्ये केटरिंग शुल्काचाही समावेश आहे. तर कॅटरिंगशिवाय चेअर कार आणि एक्झिक्युटिव्ह चेअर कारसाठी अनुक्रमे 1010 रुपये आणि 2015 रुपये तिकीट असणार आहे.