फोटो सौजन्य - Social Media
कर्जत तालुक्यातील पाली भूतीवली धरणात बुडून मुंबईतील दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. गोवंडी, मुंबई येथील इब्राहिम खान आणि खालिद शेख हे दोघे तरुण मित्र तिसऱ्या मित्रासह सकाळच्या सुमारास धरण परिसरात आले होते. त्यांनी सुर्य उगवताना मौजमजा करत धरणात पोहण्यासाठी प्रवेश केला. मात्र, खोल पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही पाण्यात बुडाले. स्थानिक आदिवासी तरुणांच्या मदतीने त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.
गोवंडी येथील शिवाजीनगर भागातील हे तिघे तरुण टूरिस्ट टॅक्सीच्या साहाय्याने पहाटे ४.३० वाजता डिकसळ येथे पोहोचले. त्यांनी आपली गाडी पाली भूतीवली धरणाच्या रस्त्यावर पार्क करून धरण परिसरात प्रवेश केला. काही वेळ मौजमजा केल्यानंतर ते धरणात अंघोळी करण्यासाठी उतरले. त्यावेळी इब्राहिम खान आणि खालिद शेख हे दोघे पाण्यात उतरले असता पाण्याचा अंदाज न लागल्याने थेट खोल भागात बुडाले. याच परिसरात असलेला चिकणमातीचा थर यामध्ये अडकून त्यांचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच डिकसळचे पोलीस पाटील राऊत यांनी तात्काळ नेरळ पोलिसांना माहिती दिली. स्वात दोरखंड घेऊन पोलीस कर्मचारी आणि स्थानिक आदिवासी तरुणांनी घटनास्थळी धाव घेतली. किरण गावंडा, हरी पिरकर, गोविंद पिरकर आणि रमेश पारधी या तरुणांनी पोलिसांच्या मदतीने सुमारे २० फूट खोल पाण्यातून मृतदेह बाहेर काढले. उपनिरीक्षक भास्कर गच्चे यांच्या मार्गदर्शनाखाली मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णवाहिकेतून पाठवण्यात आले.
या महिन्यात ही दुसरी घटना असून याआधीही अशाच प्रकारे पाषाणे धरणात एक पर्यटक बुडून मृत्युमुखी पडला होता. या परिसरात आजवर १०० पेक्षा जास्त लोकांचे बळी गेले आहेत, अशी माहिती स्थानिक प्रकल्पग्रस्त शेतकरी सचिन गायकवाड यांनी दिली. त्यांनी धरण परिसरात प्रवेशास बंदी असूनही पर्यटक येत असल्याने धरणाच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनल्याचे सांगितले. पाटबंधारे विभाग आणि पोलिसांनी यावर कठोर उपाय योजना राबवावी, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.