
बेस्टला झालयं तरी काय? मानखुर्दमध्ये बेस्ट बसचा भीषण अपघात; ६५ वर्षीय पादचाऱ्याचा मृत्यू, तर ७ जण जखमी
सोमवारी सकाळी मुंबईतील मानखुर्द परिसरात बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट (बेस्ट) बस अनियंत्रित होऊन महामार्गावरील डिव्हायडरला धडकली. या अपघातात डिव्हायडरजवळ उभ्या असलेल्या एका ६५ वर्षीय वृद्धाचा दुर्दैवाने मृत्यू झाला. बसचे चालक आणि वाहकही जखमी झाले.
Mumbai BEST Bus Accident : मुंबईत पुन्हा भीषण अपघात! बेस्ट बसचे …
स्थानिक अधिकारी आणि पोलिसांच्या माहितीनुसार, हा अपघात सायन-पनवेल महामार्गावरील एका रुग्णालयासमोरच घडला. भरधाव वेगाने जाणाऱ्या बेस्ट बसने नियंत्रण गमावले आणि ती डिव्हायडरला धडकली, या अपघातात रस्त्यावर उभे असलेले भास्कर रावसाहेब पांडे (६५) गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने जवळच्या राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान क्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या अपघातात बस चालक बनवारी श्रीराम प्रसाद शर्मा (५१) आणि वाहक वैभव वाघमारे (४१) जखमी झाले. दोघांनाही राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. स्थानिक पोलिसांनी गुन्हा दाखल करून अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू केला आहे.
मुंबईत गेल्या काही दिवसांपासून बेस्ट बसच्या अपघातांमध्ये वाढ झाली आहे. यापूर्वी, १० जुलै रोजी अंधेरी परिसरात एका बेस्ट बसवरील नियंत्रण सुटल्याने ती १४ वाहनांना धडकली, ज्यात आठ जण जखमी झाले. तसेच ८ जुलै रोजी भांडुप परिसरात एका इलेक्ट्रिक बेस्ट बसवरील नियंत्रण सुटल्याने अनेक वाहनांचे नुकसान झाले आणि एक व्यक्ती जखमी झाली. अपघातांच्या या वाढत्या घटनांमुळे बसची देखभाल आणि चालकांच्या सुरक्षिततेच्या मानकांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
अपघातानंतर वाशीच्या दिशेने जाणारी वाहतूक काही काळ पूर्णपणे विस्कळीत झाली. मानखुर्द मेट्रो स्थानकाखाली वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. मुंबई वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत करण्याचे काम केले. अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.