फोटो सौजन्य- सोशल मीडिया
मुंबईतील भाजपचा गड मानला जाणारा मतदारसंघ म्हणून ओळख असलेल्या बोरीवली मतदारसंघाला खिंडार पडले आहे. भाजपने संजय उपाध्याय यांना उमेदवारी दिली. जशी या उमेदवारीची घोषणा झाली तसेच माजी खासदार गोपाळ शेट्टी यांनी या उमेदवारीला विरोध दर्शवत स्वत: अर्ज भरण्याचे जाहीर केले होते. आज सकाळी त्यांनी बोरीवली विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून अर्ज भरला आहे.
पक्षाने स्थानिक उमेदवार द्यावा ही मागणी गोपाळ शेट्टी यांच्याकडून केली जात होती तसेच बोरीवलीमध्ये उमेदवार देताना पक्षाकडून कोणत्याही प्रकारचा संवाद साधण्यात आला नाही अशीही नाराजी त्यांनी व्यक्त केली होती. मात्र पक्षाने मुंबई सरचिटणीस संजय उपाध्याय यांना उमेदवारी दिल्याने गोपाळ शेट्टी यांनी काल अपक्ष उमेदवारी अर्ज भरण्याचे जाहीर केले होते. आज जोरदार शक्तीप्रदर्शन करत त्यांनी
आशिष शेलार यांनी मध्यरात्री गोपाळ शेट्टी यांची घरी भेट घेत मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यामध्ये एक तास चर्चा झाली. मात्र गोपाळ शेट्टी यांनी आपल्या निर्णयावर ठाम राहण्याचा पवित्रा घेतला. ते आशिष शेलार यांना म्हणाले की,मागील 33 वर्षामध्ये मी एकही चुकीचे काम केले असेल तर पक्षाने सांगावे, मी मरेपर्यंत पक्षांच मजुरासारखे काम करणार. एवढा मोठा निर्णय घेताना कोणाशीही चर्चा केली नाही हे योग्य नसून वारंवार छळ करणे योग्य नाही. ही लढाई मी लढणार आहे. चुकीची माहिती देत असणाऱ्या नेत्यांची हकालपट्टी करावी. पक्षाकडे माझ्याबाबतीत काही माहिती असल्यास ते लोकांसमोर जाहीर करावे.
नगरसेवक ते खासदार
गोपाळ शेट्टी यांनी नगरसेवकापासून ते खासदारकी पर्यंत वाटचाल केली आहे. 1992 ते 2004 या काळात नगरसेवक होते. तर 2004 ते 2014 या कालावधीत ते या मतदारसंघातून आमदार होते. 2014 ते 2024 या कालावधीत त्यांनी लोकसभेत त्यांनी उत्तर मुंबईचे प्रतिनिधित्व केले. या मतदारसंघातून ते रेकॉर्डब्रेक मताधिक्क्यांनी निवडून आले होते. मात्र 2024 च्या लोकसभा निवडणूकीमध्ये त्यांचे तिकीट कापून मंत्री पीयूष गोयल यांना उमेदवारी देण्यात आली होती. पीयूष गोयल या मतदारसंघातून निवडूनही आले.
गेली 40 वर्षे बोरीवली भाजपचा बालेकिल्ला
बोरीवली मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला मानला जातो या मतदारसंघामध्ये भाजपने पक्षाच्या स्थापनेपासून म्हणजे 1980 पासून वर्चस्व राखले आहे. 80 च्या दशकात राम नाईक हे या मतदारसंघातून आमदार होते. त्यानंतर हेमेंद्र मेहता तीन टर्म आमदार होते. त्यानंतरच्या काळात गोपाळ शेट्टी दहा वर्षे आमदार होते.
2014 पासून भाजपकडून बाहेरचा उमेदवार
2014 पासून या मतदारसंघात स्थानिक उमेदवार भाजपकडून दिला गेला नाही. 2014 साली माजी मंत्री विनोद तावडे यांना उमेदवारी दिली गेली होती. तर 2019 साली विनोद तावडे यांचे तिकीट कापून सुनील राणे यांना उमेदवारी दिली गेली. आता संजय उपाध्याय यांना उमेदवारी देत पुन्हा भाजपने स्थानिक उमेदवाराला संधी न देता मतदारसंघाच्या बाहेरचा उमेदवार दिला आहे.