
E20 पेट्रोलच्या गुणवत्तेवर बीपीसीएलचे स्पष्टीकरण; 893 नमुन्यांमध्ये इथेनॉलचे प्रमाण योग्य
कर्नाटकात ग्राहक जनजागृती उपक्रमांतर्गत BPCL चे अधिकारी विविध ऊर्जा केंद्रांवर E20 पेट्रोलमधून इथेनॉल वेगळे करण्याच्या चाचणीचे प्रात्यक्षिक दाखवत आहेत. या प्रक्रियेत 100 मिली E20 इथेनॉल मिश्रित मोटार स्पिरिटमध्ये 30 मिली पाणी मिसळून इथेनॉल आणि पेट्रोल वेगळे केले जाते. चाचणीच्या सुरुवातीला मिश्रण काहीसे धुरकट किंवा दुधाळ दिसते. ही सामान्य प्रक्रिया असून, इथेनॉल-पाणी आणि पेट्रोलचे स्वतंत्र थर तयार होण्यासाठी काही वेळ लागतो.
सध्या चर्चेत असलेल्या घटनेत विलगीकरणाची प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वीच छायाचित्र काढण्यात आले आणि ते समाजमाध्यमांवर प्रसारित झाले. त्यामुळे चाचणीचा अंतिम निष्कर्ष न दिसता प्रक्रियेच्या मधल्या टप्प्यातील स्थिती समोर आली. संभाव्य गैरसमज टाळण्यासाठी संबंधित अधिकाऱ्याने ही पोस्ट तातडीने हटविली. संबंधित नमुन्याची चाचणी पूर्ण केल्यानंतर तो निर्धारित गुणवत्तेनुसार योग्य असल्याचे आढळल्याचे बीपीसीएलने म्हटले आहे.
कंपनीच्या म्हणण्यानुसार, किरकोळ विक्री केंद्रांमधून पुरवठा होणाऱ्या E20 पेट्रोलच्या गुणवत्तेवर नियमित देखरेख ठेवली जाते. भारतीय मानक ब्युरोने (BIS) IS 17021 अंतर्गत निश्चित केलेल्या लागू गुणवत्ता मानकांचे पालन केले जाते.
दरम्यान, तेल विपणन कंपन्यांकडून उच्च तंत्रज्ञान केंद्राच्या (CHT) समन्वयाने गुणवत्ता तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत आतापर्यंत 27 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील E20 पेट्रोलचे 893 नमुने तपासण्यात आले आहेत. या सर्व नमुन्यांमध्ये इथेनॉलचे प्रमाण निर्धारित 19 ते 21 टक्क्यांच्या मर्यादेत असल्याचे आढळल्याचा दावा कंपनीने केला आहे. यामध्ये बीपीसीएलने तपासलेल्या 280 नमुन्यांचाही समावेश आहे.
इंधनाची गुणवत्ता, कामकाजातील पारदर्शकता आणि ग्राहकांचा विश्वास कायम राखण्यासाठी कंपनी कटिबद्ध असल्याचे बीपीसीएलने स्पष्ट केले आहे. ग्राहकांनी चाचणीच्या निर्धारित प्रक्रियेनुसार मिळालेले निष्कर्ष आणि अधिकृत गुणवत्ता तपासणी यंत्रणांचे अहवाल यांनाच महत्त्व द्यावे, असे आवाहनही कंपनीने केले आहे.
Ans: E20 हे इथेनॉल मिश्रित पेट्रोल असून, त्यामध्ये साधारण 20 टक्के इथेनॉल आणि उर्वरित पेट्रोल असते.
Ans: चाचणीदरम्यान घेतलेल्या छायाचित्रामुळे गैरसमज निर्माण झाल्याचे बीपीसीएलने म्हटले आहे. संबंधित नमुन्याची चाचणी पूर्ण केल्यानंतर तो निर्धारित गुणवत्ता निकषांनुसार योग्य असल्याचे कंपनीने स्पष्ट केले.
Ans: भारतीय मानक ब्युरोने (BIS) IS 17021 अंतर्गत निश्चित केलेल्या लागू गुणवत्ता मानकांनुसार तपासणी केली जात असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.