
मोठी बातमी ! रस्त्यांवर फटाके फोडण्यास आता बंदी; डीजे, लेझर बीमलाही विरोध
मुंबई : रस्त्यांवर फटाके फोडण्यास मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी पूर्णपणे बंदी घातली. ध्वनी आणि वायू प्रदूषण न करता सण साजरे करता येऊ शकतात, असे न्यायालयाने स्पष्ट केले. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला.
धार्मिक मिरवणुका आणि यात्रांमध्ये मोठ्या आवाजातील ध्वनिक्षेपक, डीजे तसेच लेझर बीमचा वापर करणे पूर्णपणे अनुचित असल्याचे न्यायालयाने नमूद केले. “ध्वनिक्षेपक आणि फटाक्यांचा वापर केल्याने देवाकडून आपल्याला अतिरिक्त आशीर्वाद मिळणार आहेत का? जबाबदार समाज म्हणून आपण या सर्व गोष्टींवर नियंत्रण आणले पाहिजे,” अशी टिप्पणी न्यायालयाने केली. धार्मिक मिरवणुका आणि यात्रांमुळे होणाऱ्या गंभीर ध्वनी व वायू प्रदूषणाची दखल घेत न्यायालयाने सोमवारी स्वतःहून याचिका दाखल करून घेतली होती.
दरम्यान, महाराष्ट्र सरकारच्या वतीने महाधिवक्ता मिलिंद साठे यांनी मुंबई पोलिसांनी ९ ते २६ सप्टेंबरदरम्यान परवानगीशिवाय पाचपेक्षा अधिक व्यक्तींच्या जमावावर निर्बंध घातल्याची माहिती दिली. फटाके आणि ध्वनिक्षेपकांवरही निर्बंध असल्याचे त्यांनी सांगितले.
पंढरपूरच्या वारीचे उदाहरण
न्यायालयाने पंढरपूरच्या वारीचे उदाहरण दिले. कोणत्याही ध्वनिक्षेपकाशिवाय आणि गोंगाटाशिवाय वारी शांततेत पार पडते, असे खंडपीठाने सांगितले. रस्त्यांवर फटाके फोडण्यास बंदी घालताना न्यायालयाने धार्मिक मिरवणुकांमधील ध्वनीची पातळी नियंत्रित करण्याचे आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले.
नियमांची प्रत्यक्ष अंमलबजावणी महत्त्वाची
फटाके आणि ध्वनिक्षेपकांवरही निर्बंध असले तरी मात्र, या आदेशांची प्रत्यक्षात अंमलबजावणी होत आहे का, असा सवाल न्यायालयाने केला. “हा आदेश केवळ कागदावर चांगला दिसतो. त्याचे उल्लंघन स्पष्टपणे दिसून येत आहे,” असे न्यायालयाने नमूद केले.