
"गुन्ह्यांची माहिती लपवणाऱ्या किशोरी पेडणेकरांची उमेदवारी रद्द करा", शिवसेना आमदार निलेश राणे यांची मागणी
बाळासाहेब भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत आमदार राणे यांनी सांगितले की, मुंबई महापालिकेच्या वॉर्ड क्रमांक १९९ मधील उबाठा उमेदवार किशोरी पेडणेकर यांच्यावर २०२३ मध्ये दोन फौजदारी गुन्हे दाखल झाले आहेत. त्या आता जामिनावर बाहेर आहेत. मात्र पेडणेकर यांनी निवडणुकीत उमेदवारी अर्जात ही माहिती लपवली आहे. आरपीए १२५ ए कायद्यानुसार एखाद्या उमेदवाराने माहिती लपवली असल्यास सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार संबधित उमेदवाराची निवड रद्द करण्यात येते. त्यामुळे किशोरी पेडणेकर यांची उमेदवारी रद्द व्हायला हवी, असे आमदार राणे म्हणाले.
पेडणेकर यांना उमेदवारी देण्यात आली नव्हती मात्र त्यांनी उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांना धमकी देऊन त्यांनी उमेदवारी मिळवली, असे आमदार राणे म्हणाले. कोविडमधील सगळं बाहेर काढेन, असे ठाकरेंना सांगून ब्लॅकमेल केलं आणि तिकिट मिळवलं, असे आमदार राणे म्हणाले. एक गुन्हा बॉडीबॅग घोटाळ्याचा आहे. कोविड काळात मुंबई महापालिकेने १६०० रुपये किमतीची बॉडीबॅग ६७१९ रुपयांना खरेदी केली. इन्फोटेक कंपनीकडून हजारो बॉडीबॅगची खरेदी केली आणि यातून मोठा भ्रष्टाचार केला, असा आरोप आमदार राणे यांनी केला. दुसरा गुन्हा एसआरए प्रकल्पासंदर्भात झालेला आहे. त्यामुळे गुन्हा दाखल असलेली व्यक्ती महापालिकेत निवडून गेल्यावर सेवा करेल की लुटमार करेल याचा वरळीकर मतदारांनी विचार करायला हवा, असे आवाहन आमदार राणे यांनी केले. पेडणेकर यांनी माणसुकी ठेवून निवडणूक प्रक्रियेतून बाहेर पडावं. या प्रकरणी पेडणेकर शंभर टक्के अपात्र ठरतील. या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात दाद मागू, असे आमदार राणे म्हणाले.
मुंबईच्या विकासावर बोलण्याऐवजी मुंबईला आणि महाराष्ट्रामध्ये फूट पाडणारे मुद्दे मांडत आहेत, अशी टीका आमदार निलेश राणे यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंवर केली. ठाकरे मुंबईत इतकी वर्ष सत्तेत असताना कोणती विकास कामं केली ही त्यांनी सांगावीत, असे आमदार राणे म्हणाले. राज ठाकरेंकडून चांगल्या विषयाची अपेक्षा होती, मात्र त्यांचे विचार पाहून ती फोल ठरली. लंडनला जाताना ठाकरेंना गुजराती माणूस कसा चालतो, असा सवाल आमदार राणे यांनी केला. मुंबई काबीज करण्याचा प्रयत्न तुमची घरं चालवण्यासाठी करत आहेत. बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाशेजारी आदित्य आणि अमित ठाकरेंनी चॅनलला मुलाखत दिली. त्यांनी तेथील पावित्र्य भंग केलं, असे आमदार राणे म्हणाले.