"... हे उघड व्हायलाच हवं''; फडणवीसांच्या कार्यालय तोडफोड प्रकरणात चित्रा वाघांचे महत्वाचे विधान
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आहे. एका महिलेने काल (दि.२६) ही तोडफोड केली असून याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मंत्रालयात कडेकोट बंदोबस्तही असतानाही देवेंद्र फडणवीसांच्या कार्यालयाची हा महिलेने मोठी नासधूस केली. बोलण्यातून आपला रोष व्यक्त करत या महिलेने फडणवीस यांचे नावाचे फलक फोडत आणि त्यांचे कार्यालय फोडले. यावरुन आता राजकारण सुरु असून विरोधकांनी सत्ताधारी भाजपवर टीकेची झोड उठवली आहे. तर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी देखील हे षडयंत्र तर नाही ना? असा प्रश्न उपस्थित केला आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील कार्यालयाची तोडफोड प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केली आहे. ”राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस जी यांच्या कार्यालयाच्या तोडफोडीची चौकशी करा. हे एखादे षडयंत्र तर नाही ना ? राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयात घुसून एका महिलेने केलेल्या तोडफोडीची सखोल चौकशी व्हावी, तिच्यामागे नेमके कोण आहे, हे उघड व्हायलाच हवं”, अशी प्रतिक्रिया चित्रा वाघ यांनी दिली आहे.
हेही वाचा: मंत्रालयातील देवेंद्र फडणवीसांच्या कार्यालयाची तोडफड करणारी ती महिला कोण?
पुढे बोलताना भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ म्हणाल्या, ”सर्वात प्रथम या महिलेची मानसिकता काय आहे हे तपासून तिने केलेले कृत्य कशासाठी केले? यामागील षडयंत्र काय आणि कोणाचे हे पाहायला पाहिजे. सध्या देवेंद्र फडणवीस यांच्या राज्यभर सभा आणि बैठका होत आहेत. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळत आ. शिवाय लाडक्या बहीण योजनेला उदंड प्रतिसाद मिळतोय, हे ज्याला पाहवत नाही त्याने या महिलेच्या हातून तर हे कृत्य करून घेतले नाही ना? हे ही त्वरित तपासणे गरजेचे आहे. ही महिला मंत्रालयात घुसलीच कशी? अशी आवई उठवणाऱ्या विरोधकांना एकच सांगणे आहे,सगळे प्रवेश करतात त्याच पद्धतीने ती गेली असणार. हे सरकार सर्वसामान्यांचे सरकार आहे. त्यामुळे अनेक जण कामासाठी मंत्रालयात येतात, पण प्रत्येकाच्या मनात काय चाललयं हे समजु शकत नाही. सत्यस्थिती समोर आल्यावर स्पष्ट होईलचं तरीही हा एखाद्या षड्यंत्राचा भाग तर नाही ना, याची मात्र त्वरित चौकशी व्हायलाच हवी.”
राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस जी यांच्या कार्यालयाच्या तोडफोडीची
चौकशी करा : हे एखादे षडयंत्र तर नाही ना ?राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस जी यांच्या कार्यालयात घुसून एका महिलेने केलेल्या तोडफोडीची सखोल चौकशी व्हावी, तिच्यामागे नेमके कोण आहे, हे… pic.twitter.com/50n4xsmNrO
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) September 27, 2024
मंत्रालयातील सहाव्या मजल्यावर गृहमंत्री फडणवीस यांचं कार्यालय आहे. गुरूवारी सायंकाळी मुसळधार पावसामुळे मंत्रालयात फारशी गर्दीही नव्हती. तसेच, कर्मचारीही नव्हते. कर्मचारी वर्गाची उपस्थितीही फारशी नव्हती. पावसामुळे कर्मचारी आणि अधिकारी घरी पोहचायचे म्हणून निघून गेले होते. सहा साडेसहाच्या दरम्यान एक महिला थेट फडणवीसांच्या कार्यालयात घुसली आणि आराडाओरडा करायला सुरूवात केली.