मुंबईकरांचा प्रवास होणार गारेगार! तिकीट दर तितकाच की...? मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा
मुंबई: लोकल ट्रेन ही मुंबईकरांची जीवनवाहिनी आहे. लाखो मुंबईकर रोज लोकल ट्रेनने प्रवास करत असतात. आता लाखो मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. लवकरच मुंबईकरांना लोकलमधून सुखकारक प्रवास करता येणार आहे. कारण आता मेट्रोप्रमाणेच लोकल ट्रेनमध्ये देखील एसी डबे बसवले जाणार आहेत. लोकल ट्रेनमध्ये एसी कोचेस लावले जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
लवकरच मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये एसी कोचेस बसवले जाणार आहेत. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली आहे. तसेच प्रवाशाना यासाठी जास्त पैसे मोजावे लागणार नाहीये. म्हणजेच एसी कोचेस बसवले गेले तरी तिकीटदरात कोणतीही वाढ होणार नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.
एसी कोचेसमध्ये बंद होणारे दरवाजे असणार आहेत. हे कोचेस पूर्णपणे नवीन असतील असे फडणवीस म्हणाले आहेत. महाराष्ट्र विधानसभेच्या अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी त्यांनी याबाबत घोषणा केली आहे. काही दिवसांपूर्वी मुंब्रा येथे लोकल ट्रेनमध्ये मोठा अपघात घडला होता. तसेच अनेकदा लोकल ट्रेनला दरवाजे नसल्याने अपघाताच्या घटना घडल्या आहेत. लोक अत्यंत गर्दीतून प्रवास करत आहेत. एका बाजूला मेट्रो आहे. तर दुसऱ्या बाजूला लोकल ट्रेन आहे. लोकल ट्रेनला दरवाजे नसल्याने अपघात होतात, असे फडणवीस म्हणाले.
मुंब्रा रेल्वे अपघाताबाबत रेल्वे प्रशासनाचा घोर निष्काळजीपणा
ठाणे जिल्ह्यात एक दुर्दैवी रेल्वे अपघात उघडकीस आला असून सोमवारी सकाळी (9 जून) मुंब्रा रेल्वे स्थानकावर गर्दीमुळे अनेक प्रवासी चालत्या लोकल ट्रेनमधून पडून 4 जणांचा मृत्यू झाला. या अपघातात अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. रेल्वेने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ट्रेनमध्ये जास्त गर्दी असल्याने हा अपघात झाला. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) कडे जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये प्रवास करणारे काही प्रवासी मुंब्रा स्थानकाजवळ ट्रेनमधून पडले. याचदरम्यान आता रोहिदास मुंडे यांनी रेल्वे प्रशासनावर गंभीर आरोप केले आहे.
कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख रोहिदास मुंडे (शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) यांनी या घटनेवर तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटलं आहे की, “प्रवाशांचे जीव हे आकडे नसून कुटुंबाचे आधार आहेत. या निष्पाप प्रवाशांचा मृत्यू म्हणजे थेट रेल्वे प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा परिणाम आहे. या प्रकाराला जबाबदार असलेल्यांवर तत्काळ कारवाई झाली पाहिजे.”