मुंब्रा रेल्वे अपघाताबाबत रेल्वे प्रशासनाचा घोर निष्काळजीपणा, रोहिदास मुंडे यांचा गंभीर आरोप
Rohidas Munde on Mumbai Local In Marathi: ठाणे जिल्ह्यात एक दुर्दैवी रेल्वे अपघात उघडकीस आला असून सोमवारी सकाळी (9 जून) मुंब्रा रेल्वे स्थानकावर गर्दीमुळे अनेक प्रवासी चालत्या लोकल ट्रेनमधून पडून 4 जणांचा मृत्यू झाला. या अपघातात अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. रेल्वेने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ट्रेनमध्ये जास्त गर्दी असल्याने हा अपघात झाला. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) कडे जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये प्रवास करणारे काही प्रवासी मुंब्रा स्थानकाजवळ ट्रेनमधून पडले. याचदरम्यान आता रोहिदास मुंडे यांनी रेल्वे प्रशासनावर गंभीर आरोप केले आहे.
मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ आज (9 जून) सकाळी 9.30 वाजता घडलेला भीषण अपघात हा केवळ दुर्घटना नसून रेल्वे प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा थरारक पुरावा आहे. कसाऱ्याहून मुंबईकडे येणाऱ्या लोकल ट्रेनमधून पाच प्रवासी गाडीच्या दारातून खाली पडले आणि त्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. ही घटना थरकाप उडवणारी असली तरी रेल्वे प्रशासनाच्या बाजूने अद्याप कोणताही अधिकृत खुलासा करण्यात आलेला नाही आणी हीच बाब धक्कादायक आहे. गर्दीमुळे प्रवासी दारात लटकून प्रवास करत होते. ही बाब नवीन नाही, मात्र उपाययोजना करण्याची जबाबदारी कुणाची?
कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख रोहिदास मुंडे (शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) यांनी या घटनेवर तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटलं आहे की, “प्रवाशांचे जीव हे आकडे नसून कुटुंबाचे आधार आहेत. या निष्पाप प्रवाशांचा मृत्यू म्हणजे थेट रेल्वे प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा परिणाम आहे. या प्रकाराला जबाबदार असलेल्यांवर तत्काळ कारवाई झाली पाहिजे.”