
drainage (फोटो सौजन्य- social media)
मुंबईतील मिठी नदी आणि नाल्यांमधून गाळ काढण्यासाठी पुढील ५० दिवसांचे नालानिहाय आणि दिवस निहाय नियोजन करा. आपापल्या कार्यक्षेत्रातील नाल्यांवर दररोज भेट देवून सुरू असलेल्या कामांचा आढावा घ्या. यासह पावसाळ्यात विविध प्राधिकरणांशी सतत संपर्कात राहा, अशा सूचना महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी यांनी दिल्या. येत्या ५० दिवसांत म्हणजेच ३१ मे २०२५ च्या आधी नाले स्वच्छतेची कामे कशी पूर्ण होतील, याची दक्षता घ्यावी, असेही गगराणी यांनी सांगितले.
एकाच तिकिटावर लोकल, बस, मेट्रो प्रवास, महिन्याभरात मुंबई वन कार्ड सेवेत
मुंबईतील पावसाळापूर्व कामे वेगाने सुरू आहेत. मिठी नदीसह शहर, पूर्व उपनगरे आणि पश्चिम उपनगरांतील प्रमुख नाल्यांमधून गाळ काढण्याच्या कामांची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी मुंबई महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या अध्यक्षतेखाली आज शुक्रवारी महत्त्वाची बैठक पार पडली. तेव्हा गगराणी बोलत होते.
… अन्यथा कंत्राटदारावर कारवाईचा इशारा
नालेनिहाय पावसाचे पाणी साचण्याच्या ठिकाणाच्या १०० मीटरच्या त्रिज्येमध्ये जे लहान, मोठे नाले आहेत ते चांगल्या पद्धतीने स्वच्छ होत आहेत की नाही, याचीही पर्जन्य जलवाहिनी विभागाच्या अधिकाऱ्यांनी खात्री करावे. काही मोबाईल पंप हाताशी ठेवा. एखाद्या ठिकाणच्या पंपामध्ये ऐनवेळी बिघाड झाला, तर त्याठिकाणी मोबाईल पंपाद्वारे पाणीउपसा सुरू ठेवता येईल. पंपामध्ये सातत्याने बिघाड झाला तर पंप पुरविणाऱ्या कंत्राटदारावर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही गगराणी यांनी दिला.
कामांचे नियोजन करा
आपापल्या परिसरातील परिमंडळाचे उपआयुक्त, सहाय्यक आयुक्त यांच्या सोबत सतत संपर्कात रहा. अशा शब्दात गगराणी यांनी मार्गदर्शन केले. आयुक्त गगराणी यांनी सध्यस्थितीत सुरू असलेल्या नालेसफाईच्या कामांचा आढावा घेत काही काही महत्त्वाच्या सूचनाही उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या. नालेस्वच्छतेच्या कामांमध्ये गुणवत्ता आणि पारदर्शकता ठेवा. गाळ काढण्यावर भर देत असतानाच भविष्यात पूरपरिस्थिती उद्भवणार नाही, यासाठी उपाययोजना आखा. प्रत्येक लहान-मोठा नाला तसेच मिठी नदींतील कामांचा दैनंदिन आढावा घेतला जाणार आहे. त्यानुसार प्रत्येक अभियंत्याने आपल्याकडे सुरू असलेल्या कामाचे नियोजन करावे. कामांचा टप्पा, त्यासाठी लागणारी यंत्रसामुग्री आणि हातात असलेला कालावधी या त्रिसूत्रीचा वापर करून कामांचे नियोजन करा, अशा सूचना गगराणी यांनी केल्या.
वेळापत्रक बनवा
या बैठकीत अतिरिक्त महापालिका आयुक्त अभिजीत बांगर, उप आयुक्त शशांक भोरे, प्रमुख अभियंता श्रीधर चौधरी यांच्यासह संबंधित अधिकारी, अभियंते उपस्थित होते. आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी म्हणाले, आपल्या भागात सुरू असलेल्या नालेसफाईच्या कामांची इत्यंभूत माहिती प्रत्येक अधिकाऱ्याला असायलाच हवी. त्या कामाची सद्यस्थिती, त्या ठिकाणचे आव्हाने, पावसाळ्यात उद्भवणाऱ्या समस्या आदींबाबत आतापासूनच नियोजन करून त्यावर तोडगा काढा. कार्यालयीन कामे सांभाळून प्रत्येक अभियंत्याने प्रत्यक्ष नालेसफाई सुरू असलेल्या ठिकाणी दररोज भेट द्यायला हवी. आपल्याकडील कामांचे आणि उर्वरित दिवसांचे सूक्ष्म नियोजन करून त्यानुसार वेळापत्रक तयार करा.