दहिसर टोल नाक्यामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीतून अखेर सुटका! (Photo Credit- X)
मुंबई: मुंबई महानगर क्षेत्रात प्रवेश करताना मीरा-भाईंदर शहराच्या वेशीवर असलेल्या दहिसर टोल नाक्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता. यामुळे होणारा अनावश्यक इंधनाचा अपव्यय आणि प्रदूषण थांबवण्यासाठी हा टोल नाका स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परिवहन मंत्री श्री. प्रताप सरनाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा टोल नाका दिवाळीपूर्वी तेथून पुढे २ किलोमीटर अंतरावरील वर्सोवा पुलासमोर असलेल्या नर्सरी जवळ हलवण्यात येणार आहे.
उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथ शिंदे यांच्याकडे झालेल्या बैठकीत या महत्त्वपूर्ण निर्णयावर शिक्कामोर्तब झाले. या बैठकीला दहिसरचे आमदार प्रकाश सुर्वे, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक मनोज जिंदल, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे सुहास चिटणीस, वसई-विरार आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त निकेत कौशिक, IRB चे ठेकेदार विरेंद्र म्हैसकर यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
🗓 ९ सप्टेंबर २०२५ | 📍मुंबई
दहिसर टोल नाका वर्सोवा पुलासमोरील नर्सरी जवळ स्थलांतरित करण्यात येणार
मुंबई महानगर क्षेत्रांत प्रवेश करताना मीरा-भाईंदर शहराच्या वेशीवर असलेल्या दहिसर टोल नाक्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होऊन अनावश्यक इंधनाचा अपव्यय होतो. तसेच… pic.twitter.com/skEWsMLXKt
— Pratap Baburao Sarnaik (@PratapSarnaik) September 9, 2025
मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, “दहिसर टोल नाक्यामुळे मीरा-भाईंदर शहरातील सुमारे १५ लाख स्थानिक नागरिक, तसेच मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांना प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता. यामुळे प्रवासाचा वेळ अर्धा ते एक तास वाढत होता आणि इंधनाचा विनाकारण अपव्यय होत होता.” यावर तोडगा काढण्यासाठी मीरा-भाईंदर महापालिका हद्दीतच असलेला हा टोल नाका शहराच्या बाहेर हलवण्याची आग्रही मागणी श्री. सरनाईक यांनी केली होती. या निर्णयामुळे मीरा-भाईंदर व मुंबई दरम्यानचा प्रवास अधिक सुलभ होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या संदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावला. त्यांनी दिलेल्या निर्देशानुसार, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ या बाबतचा प्रस्ताव राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे पाठवेल. केंद्रीय वाहतूक मंत्रालयाकडून या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर टोलनाका स्थलांतरणाची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. यासाठी एक ते दीड महिन्याचा कालावधी लागेल, असे श्री. सरनाईक यांनी सांगितले. त्यामुळे या दिवाळीपूर्वी हा टोलनाका स्थलांतरित होण्याची शक्यता आहे. या निर्णयामुळे स्थानिक नागरिकांना टोलमुक्त प्रवासाचा लाभ मिळेल आणि वाहतुकीवरील ताण कमी होईल, असा विश्वास परिवहन मंत्र्यांनी व्यक्त केला आहे.