
एसटीच्या NCMC कार्ड सवलतीच्या नावाखाली प्रवाशांची लूट; श्रीरंग बरगे यांचा संतप्त आरोप
महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी एसटी प्रशासनावर संतप्त आरोप
केंद्र सरकारच्या ‘एक राष्ट्र, एक कार्ड’ या संकल्पनेनुसार एकाच राष्ट्रीय सामाईक गतिशीलता कार्डाद्वारे देशभरातील मेट्रो, बस, टोलनाके आणि सार्वजनिक वाहतूक सेवांचा लाभ घेता यावा, हा या योजनेचा मूळ उद्देश आहे. मात्र, एसटी महामंडळाने या संकल्पनेलाच हरताळ फासल्याचा आरोप बरगे यांनी केला.
एसटी महामंडळाने १ एप्रिल २०२६ पासून सवलतधारकांसाठी १९९ रुपये किमतीचे राष्ट्रीय सामाईक गतिशीलता कार्ड अनिवार्य केले, तर १ सप्टेंबरपासून जुने पास बंद केले. त्यामुळे विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना सवलतीचा लाभ घेण्यासाठी सक्तीने कार्ड खरेदी करावे लागत आहे. कार्ड नसल्यास सवलत नाकारली जात आहे. ही सक्ती म्हणजे सर्वसामान्य प्रवाशांवर लादलेला अन्याय असल्याचे बरगे यांनी म्हटले आहे.
ग्रामीण भागात नेटवर्कची समस्या; ई-तिकीट यंत्रांमध्ये रिचार्जची अडचण
“महामंडळाने १२ ऑगस्टपर्यंत एक कोटी नोंदणी झाल्याचा दावा केला आहे. मात्र, ग्रामीण भागात मोबाईल नेटवर्कची समस्या, ई-तिकीट यंत्रांद्वारे कार्ड रिचार्ज न होणे आणि कार्डावरील शिल्लक रकमेचा तपशील न दिसणे, अशा अनेक अडचणी प्रवाशांना भेडसावत आहेत. कार्ड असूनही सवलतीचा लाभ मिळत नसल्याने प्रवाशांना पुन्हा तिकीट काढावे लागते. त्यामुळे त्यांना दुहेरी आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे,” असा आरोप बरगे यांनी केला.
एसटीचे राष्ट्रीय सामाईक गतिशीलता कार्ड इतर सार्वजनिक वाहतूक सेवांमध्ये वापरता येत नसल्याने प्रवाशांना वेगवेगळी कार्डे बाळगावी लागत आहेत. दुसरीकडे, बँकांकडून जारी केली जाणारी राष्ट्रीय सामाईक गतिशीलता कार्डे अनेक वाहतूक सेवांमध्ये वापरता येतात. त्यामुळे एसटीच्या कार्डाची मर्यादित उपयुक्तता प्रवाशांच्या गैरसोयीत भर घालत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
डिजिटल सुविधेच्या नावाखाली सवलतींचा हिशेब?
ई-बिक्सकॅश आणि एनएसडीएल पेमेंट्स बँकेच्या माध्यमातून दिले जाणारे हे कार्ड ग्रामीण जनतेला डिजिटल पेमेंटच्या प्रवाहात आणण्यासाठी असताना, एसटी महामंडळाने त्याचा वापर केवळ शासनाकडून मिळणाऱ्या सवलतीच्या रकमेचा हिशेब ठेवण्यासाठी केल्याचा आरोप बरगे यांनी केला.
हा कोणता प्रवासीहिताचा निर्णय?
“प्रवाशांना सुविधा देण्याऐवजी त्यांच्यावर सक्ती लादणे, तांत्रिक अडचणींकडे दुर्लक्ष करणे आणि सवलतींचा लाभ घेण्यासाठी अतिरिक्त खर्च करायला भाग पाडणे, हा कोणता प्रवासीहिताचा निर्णय आहे?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
एनसीएमसी कार्डाची सक्ती तातडीने रद्द करा
योजनेच्या अंमलबजावणीदरम्यान एसटी वाहकांना येणाऱ्या तांत्रिक अडचणी आणि कार्डाच्या सक्तीमुळे महामंडळाच्या उत्पन्नावर झालेला परिणाम लक्षात घेता, एसटी महामंडळाने राष्ट्रीय सामाईक गतिशीलता कार्डाची सक्ती तातडीने रद्द करून ते ऐच्छिक करावे, सामान्य प्रवाशांसाठीही उपलब्ध करून द्यावे आणि मुंबई मेट्रो, बेस्ट, पुणे मेट्रोसह अन्य सार्वजनिक वाहतूक सेवांमध्ये त्याचा वापर शक्य करावा, अशी मागणी श्रीरंग बरगे यांनी केली आहे.
एसटी प्रशासनाने प्रवाशांना दिलासा द्यावा
प्रवाशांना प्रत्यक्ष सुविधा मिळेपर्यंत कार्डाची सक्ती सुरू ठेवणे म्हणजे त्यांच्या आर्थिक नुकसानीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणे होय. एसटी प्रशासनाने तातडीने निर्णय घेऊन प्रवाशांना दिलासा द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
१. एसटीच्या कोणत्या योजनेवरून वाद निर्माण झाला आहे?
राष्ट्रीय सामाईक गतिशीलता कार्ड (NCMC) स्मार्ट कार्ड योजनेवरून वाद निर्माण झाला आहे.
२. NCMC कार्डबाबत कोणता आरोप करण्यात आला आहे?
कार्डची सक्ती करून सामान्य प्रवाशांवर आर्थिक भार टाकला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
३. एसटी प्रशासनावर आरोप कोणी केले आहेत?
महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी हे आरोप केले आहेत.