Devendra Fadnavis on Maharashtra Heavy rains: मराठवाड्यासह राज्यभरात अतिवृष्टीने झोडपून काढले आहे. बीड, मराठवाडा, अहिल्यानगर आणि इतर अनेक जिल्ह्यांनाही अतिवृष्टीचा तडाखा बसला आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने हाहा:कार माजवला आहे. ज्यामुळे सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाली आहे आणि जनजीवन विस्कळीत झाले आहे. राज्यातील या पूरपरिस्थितीमुळे शेतकरी मोठ्या नुकसानाला सामोरे जात आहे. अनेक गावांमध्ये पाणी शिरल्याने नागरिक अडकले आहेत. प्रशासनाकडून मदत आणि बचावकार्य वेगाने सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या पूरस्थितीची सविस्तर माहिती घेतली आहे.
आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत जिल्ह्यांतील परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला. मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्र्यांना आणि मंत्र्यांना सूचित केले आहे की उद्याही पूरग्रस्त भागांना भेट देऊन परिस्थिती पाहावी. मी स्वतः काही भागांना भेट देणार आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील अतिवृष्टी आणि पूरस्थितीचा आढावा घेतल्यानंतर सांगितले की, अहिल्यानगर, जळगाव, सोलापूर, बीड आणि परभणी या भागात अतिवृष्टी झाल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या दुर्घटनेत सुमारे ८ जणांचा मृत्यू झाला असून १० जण जखमी झाले आहेत.
राज्यातील पूरस्थितीचा आढावा घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सध्या इतका पाऊस पडला आहे की तो सरासरीपेक्षा १०२ टक्के अधिक आहे. काही भागांमध्ये पूरामुळे लोक अडकले आहेत. बीडमध्ये रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे, तर धाराशिवमध्ये एनडीआरएफच्या मदतीने २७ लोकांना हेलिकॉप्टरद्वारे सुरक्षित बाहेर काढण्यात आलं आहे. यासोबतच २०० नागरिकांना वेगवेगळ्या सुरक्षित ठिकाणी पोहचवण्यात आले आले आहे. आपत्ती व्यवस्थापन मंत्री तिथे पोहोचले असून त्यांनी अतिरिक्त हेलिकॉप्टरची मागणी केली आहे आणि त्यासाठी मीही प्रयत्न करत आहे.
विशेषत: सोलापूर,जळगाव,अहिल्यानगर, बीडसह परभणी या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे. यात सुमारे ८ जणांचा मृत्यू झाला असून १० जण जखमी झाले आहेत. आत एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या १७ तुकड्या त्या भागात मदत कार्य करत आहेत. काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांचे नुकसान पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले होते, आणि जे पंचनामे तयार होतील, तशी मदत दिली जाईल. महत्त्वाची बाब म्हणजे आतापर्यंत ३१ लाख ६४ हजार शेतकऱ्यांच्या मदतीसाठी एकूण २,२१५ कोटी रुपयांचा जीआर काढण्यात आला आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
चप्पलने मारले, संपूर्ण हॉस्टेलमध्ये निर्वस्त्र फिरवले अन्…; कॉलेजच्या विद्यार्थ्यासोबत भयानक Ragging
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, पूरग्रस्त भागांना मदत देण्यासाठी १,८२९ कोटी रुपये जिल्ह्यांमध्ये जमा केले गेले आहेत. पुढच्या ८–१० दिवसांत हे पैसे संपूर्णपणे वितरीत केले जातील. पावसामुळे काही ठिकाणी काम थांबलेले नाही आणि नवनवीन ठिकाणी पाऊस पडत असल्याने पंचनामे व मदत कार्य सातत्याने सुरु राहणार आहे.
तसेच, एका तालुक्याचे रिपोर्ट येताच शेतकऱ्यांना तातडीची मदत दिली जाईल. ज्या ठिकाणी मृत्यूंची नोंद झाली आहे. त्याठिकाणीही जिल्हाधिकाऱ्यांना मदतीचे अधिकार देण्यात आले आहेत. तसेच पुरामुळे नुकसान झालेल्या लोकांना मदत मिळेल, अशी हमी देण्यात आली आहे.