IIT बॉम्बे विद्यार्थी मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट; परीक्षा हॉल ते हॉस्टेलदरम्यान साहिल कुठे होता? iPhone 17 मधील डेटा ठरू शकतो महत्त्वाचा; क्राइम ब्रँचकडून 47 मिनिटांचा शोध
IIT बॉम्बेचा विद्यार्थी साहिल वाकोडे याच्या मृत्यू प्रकरणाचा तपास करणाऱ्या मुंबई क्राइम ब्रँचसमोर डिजिटल पुराव्यांशी संबंधित तांत्रिक आव्हान उभे राहिले आहे. साहिलचा iPhone 17 लॉक असल्यामुळे त्यातील संभाव्य डिजिटल पुराव्यांपर्यंत पोहोचणे कठीण होत असल्याचे सांगण्यात येत आहे. फोनमधील माहिती तपासासाठी महत्त्वाची ठरू शकते, त्यामुळे त्याच्या फॉरेन्सिक तपासावर क्राइम ब्रँचचे लक्ष आहे.
तपास यंत्रणेला साहिलच्या फोनमधील कॉल रेकॉर्ड, मेसेजेस, सर्च हिस्ट्री आणि इतर डिजिटल अॅक्टिव्हिटी तपासायची असल्याचे सांगण्यात येत आहे. विशेषतः 18 सप्टेंबर रोजी परीक्षा सुरू असताना आणि त्यानंतर त्याने फोनचा वापर केला होता का, कोणाशी संपर्क साधला होता का, याचा शोध घेतला जात आहे.
IIT Bombay Sahil Wakode Case : साहिल वाकोडे प्रकरणात नवा ट्विस्ट
या प्रकरणातील आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सुमारे 47 मिनिटांची टाइमलाइन. उपलब्ध CCTV फुटेजनुसार, साहिल दुपारी सुमारे 12.38 वाजता परीक्षा हॉलमधून बाहेर पडला. मात्र, तो सुमारे 1.25 वाजता हॉस्टेलच्या खोलीत पोहोचल्याचे तपासात समोर आल्याचे सांगण्यात येत आहे. परीक्षा हॉल आणि हॉस्टेलमधील अंतर लक्षात घेता या मधल्या वेळेत तो नेमका कुठे होता, कोणाला भेटला किंवा कुठे थांबला, याचा तपास केला जात आहे.
क्राइम ब्रँच परीक्षा हॉलपासून हॉस्टेलपर्यंतच्या मार्गावरील CCTV फुटेज तपासत आहे. त्याचबरोबर साहिलचा लॅपटॉपही ताब्यात घेऊन फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आल्याची माहिती समोर आली. फोनमधील डेटा मिळवण्यासाठी अधिक प्रगत डिजिटल फॉरेन्सिक तज्ज्ञांची मदत घेण्याचाही विचार केला जात असल्याचे सांगण्यात येत आहे.
या प्रकरणाचा तपास सुरुवातीला पवई पोलिसांकडे होता आणि नंतर तो मुंबई क्राइम ब्रँचकडे सोपवण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. तपासादरम्यान साहिलचे सहाध्यायी, हॉस्टेलमधील मित्र, परीक्षा प्रक्रियेशी संबंधित व्यक्ती आणि कॅम्पसमधील कर्मचाऱ्यांसह 20 हून अधिक व्यक्तींचे जबाब नोंदवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
सध्या उपलब्ध CCTV फुटेज, लॅपटॉपमधील संभाव्य डिजिटल पुरावे आणि फोनमधील डेटा यांच्या आधारे घटनाक्रम स्पष्ट करण्याचा प्रयत्न सुरू आहे. विशेषतः 18 सप्टेंबरच्या त्या 47 मिनिटांमध्ये नेमके काय घडले, हा तपासातील महत्त्वाचा प्रश्न आहे. तपास सुरू असल्याने मृत्यूमागील कारण किंवा घटनाक्रमाबाबत अंतिम निष्कर्ष अधिकृत तपास पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होऊ शकतो.
IIT Bombay Student Suicide : ‘वरच्या जातीचा मी, तू खालच्या जातीचा’






