मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी शुक्रवारी ( 29 ऑगस्ट) मुंबईतील आझाद मैदानात मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू केले. हे आंदोलन सुरू होऊन एक दिवस उलटत नाहीत तोच मुंबईच्या राजकीय वर्तुळातून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) हे सध्या मुंबईच्या दौऱ्यावर आले असून शुक्रवारी रात्री ते मुंबईत दाखल झाले. दरवर्षीप्रमाणे यंदाही ते आज लालबागच्या राजाचं दर्शन घेणार आहेत. यासोबतच ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी जाऊन गणरायाचं दर्शन घेणार असल्याची माहिती आहे.
यासोबतच अमित शाह यांनी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे (Vinod Tawde) यांच्याशी चर्चा केल्याची माहिती आहे. विनोद तावडे यांच्यासोबत झालेल्या चर्चेत राज्यातील मराठा आरक्षणाचा मुद्दा, मनोज जरांगे यांचे उपोषण यावर चर्चा केली. याशिवाय बिहार निवडणुका तसेच उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसंदर्भातील घडामोडींचाही समावेश असल्याचे बोलले जात आहे.
अमित शाहांनी तावडे यांच्याकडून मुंबईत सुरू असलेल्या मराठा आंदोलनाबाबतही शाह माहिती घेतली. त्यामुळे या बैठकीत नक्की काय ठरलं आणि चालू आंदोलनावर काही तोडगा निघतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे कालपासून कालपासून मुंबईच्या आझाद मैदानावर आमरण उपोषणाला बसले आहेत. आज या उपोषणाचा दुसरा दिवस आहे. “आरक्षण मिळाल्याशिवाय मुंबई सोडणार नाही,” अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली आहे.
सरकारने मराठा समाजाला कायमस्वरूपी आरक्षण मिळाले पाहिजे, असे आवाहन जरांगे यांनी केले. उपोषणाला फक्त मुदतवाढ देण्याऐवजी कायमस्वरूपी तोडगा काढेपर्यंत हे उपोषण सुरू राहणार असल्याचा इशाराहीत त्यांनी राज्य सरकारला दिला आहे. त्यातच अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्याला यामुळे विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या पार्श्वभूमीवर आरक्षणाच्या प्रश्नावर काही तोडगा निघतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शाह यांचा मुंबई दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. शनिवारी लालबागच्या राजाला भेट दिल्यानंतर शाह महाराष्ट्र भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत बीएमसीसह राज्यातील इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तयारीबाबत आढावा बैठक घेतील आणि भविष्यातील रणनीतीवर विचारमंथन करतील तसेच त्यांना मार्गदर्शन करतील, असे सांगण्यात येत आहे. या भेटीत शाह मुंबई भाजपचे नवनिर्वाचित अध्यक्ष अमित साटम यांच्याशी स्वतंत्रपणे चर्चा करू शकतात. बैठकीत ते मुंबईतील सध्याची राजकीय परिस्थिती, ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याचा महाआघाडीवर होणारा संभाव्य परिणाम, पक्ष विस्तार धोरण आणि निवडणुकीसाठी नवनिर्वाचित अध्यक्षांचे दृष्टिकोन समजून घेतील आणि पक्षाच्या हितासाठी मंत्रीपदेही देऊ शकतात. याशिवाय शाह मुंबई भाजपच्या इतर वरिष्ठ नेत्यांशीही चर्चा करू शकतात.