
JJ Hospital : भारतातील पहिले 'हाना' टेबल जे.जे. रुग्णालयात; हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रियांना मिळणार आधुनिक तंत्रज्ञानाची जोड!
नीता परब, मुंबई
भायखळा स्थित ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर जे. जे. समूह रुग्णालयात (JJ Hospital) आधुनिक अस्थिरोग उपचारांना चालना देण्यासाठी अत्याधुनिक हाना टेबल मंगळवारपासून अस्थिरोग विभागात दाखल होणार आहे. विशेष महत्वाची बाब म्हणजे अस्थिरोग आजारांना (हिप रिप्लेसमेंट) रामबाण असलेले हे कोट्यवधींचे अत्याधुनिक टेबल भारतातील पहिले टेबल म्हणून सर जे. जे. रुग्णालयाला मान मिळाला आहे.
डॉ. खुसरू पटेल (सर जे.जे रुग्णालयाचे सर्वात जुने माजी विद्यार्थी) आणि अमेरिकेत कार्यरत त्यांचे सुपुत्र डॉ. शिराझ पटेल यांनी ‘ग्राम सेवा ट्रस्ट’मार्फत हे टेबल सर जे.जे. रुग्णालयाला दान केले आहे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय भंडारवार, वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय सुरासे, अस्थिरोग विभागाचे प्रमुख डॉ. नादिर शाह यांच्या मार्गदर्शनाखाली हे टेबल जे. जे. रुग्णालयात आणण्यात आले आहे.
मंगळवारी दसऱ्याच्या शुभ प्रसंगी या टेबलचे उद्घाटन होणार असून नगरसेवक मकरंद नार्वेकर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी रुग्णसेवेत हे टेबल दाखल व्हावे यासाठी रुग्णालय प्रशासनाला मोलाची मदत केली आहे.
या टेबलच्या साहाय्याने डायरेक्ट अँटेरिअर अॅप्रोच या आधुनिक पद्धतीने टोटल हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया करणे सुलभ होणार आहे. या पद्धतीमध्ये स्नायूंना कमीत कमी इजा करून रुग्णांना लवकर हालचाल सुरू करण्यास मदत होऊ शकते.
दुसरीकडे, वाढते आयुर्मान, सांध्यांची झीज आणि हिप फ्रॅक्चरच्या वाढत्या प्रमाणामुळे हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रियांची गरज वाढत आहे. अशा परिस्थितीत शासकीय रुग्णालयात अत्याधुनिक उपकरण उपलब्ध झाल्यामुळे आधुनिक उपचारपद्धतींचा प्रसार, निवासी डॉक्टरांचे प्रशिक्षण आणि सर्वसामान्य रुग्णांना प्रगत उपचार उपलब्ध करून देण्यास मोलाची मदत होणार आहे.
दरम्यान, डॉ. खुसरू पटेल आणि डॉ. शिराझ पटेल यांच्या या दातृत्वपूर्ण योगदानामुळे जे. जे. रुग्णालयाच्या अस्थिरोग विभागाच्या आधुनिक उपचार सुविधांमध्ये महत्त्वपूर्ण भर पडली आहे.
Ans: हिप रिप्लेसमेंटसारख्या अस्थिरोग शस्त्रक्रिया करण्यासाठी वापरले जाणारे हे विशेष अत्याधुनिक शस्त्रक्रिया टेबल आहे.
Ans: या उपकरणामुळे डायरेक्ट अँटेरिअर अॅप्रोच पद्धतीने हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया करणे सुलभ होऊ शकते. या पद्धतीत स्नायूंना कमीत कमी इजा करण्याचा प्रयत्न केला जातो.
Ans: डॉ. खुसरू पटेल आणि त्यांचे सुपुत्र डॉ. शिराझ पटेल यांनी ‘ग्राम सेवा ट्रस्ट’च्या माध्यमातून हे टेबल दान केले आहे.