"फडणवीस सरकार उलथवून टाकण्यासाठी हे आंदोलन", लक्ष्मण हाकेंची मनोज जरांगेंच्या आंदोलनावर टीका (फोटो सौजन्य-X)
Laxman hake on maratha aarakshan Manoj Jarange : महाराष्ट्रात मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी करणारे सामाजिक कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील आज (29 ऑगस्ट) मुंबईत दाखल झाले आहेत. जरांगे यांनी मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरू केले आहे. मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणला बसण्यापूर्वी जरांगे यांनी सांगितले आहे की, गोळ्या झाडल्या तरी आम्ही मागे हटणार नाही. मुंबईत गणेशोत्सवाच्या उत्सवादरम्यान, मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा तापला आहे. याचदरम्यान आत ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली आहे.
“जरांगे नावाच्या काडीपेटीला ओबीसीतून आरक्षण का पाहिजे? जरांगे हुकूमशाह आहेत का? ते न्यायालयाला मानायला तयार नाहीत. हा आरक्षणाचा लढा नाही. जरांगेनी मुंबईकडे निघताना स्क्रिप्ट फोडली, ते म्हणले मी सरकार उलथवून लावणार. सरकार उलथवण्यासाठी जरांगेंसह अजित पवारांचे आमदार आणि खासदार सामील आहेत,” असं हाके म्हणाले. तसेच “या महाराष्ट्रात झुंडशाही जोमात आणि लोकशाही कोमात आहे. झुंडशाहीच्या जोरावर महाराष्ट्रातील ओबीसी रचना संपवण्याचा घाट घातला जात आहे. जरांगे नावाच्या काडीपेटीचा ज्वालामुखी केला. हे काम सर्वपक्षीय आमदार-खासदारांनी केलं,” अशी टीका ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी केली.
मराठा चळवळीचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी शुक्रवारी मुंबईतील आझाद मैदानावर हजारो निदर्शकांना इशारा दिला की, आमच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही. सरकारने गोळ्या झाडल्या तरी आम्ही मागे हटणार नाही. आम्हाला तुरुंगात टाकले तरी आम्ही तिथे आमचे उपोषण सुरूच ठेवू. आता महाराष्ट्र सरकार जरांगे यांच्या आव्हानाला कसे सामोरे जाते हे पाहायचे आहे. जरांगे म्हणाले की, आज मराठ्यांनी मुंबई जाम केली आहे. सरकारने निषेधाला परवानगी दिल्याने आम्ही पोलिस आणि सरकारलाही सहकार्य करू.
जरांगे म्हणाले की कुठेही दगडफेक करू नका, पोलिसांच्या कामात अडथळा आणू नका. पुढील दोन तासांत वाहने हटवून मुंबई रिकामी करा.आंदोलन शांततेत करावे, दारू पिऊन अराजकता पसरवू नये आणि समाजाचे नाव कलंकित होऊ नये याची काळजी घ्यावी. मुंबईतील आझाद मैदानात पोहोचताच जरांगे यांचे भव्य स्वागत करण्यात आले. जरांगे मुंबईत प्रवेश केल्यानंतर भगवे झेंडे आणि शिवाजीचे फोटो रस्त्यावर फडकत होते. एक मराठा-लख मराठाचा नारा गूंजत आहे.