मध्य रेल्वे मार्गावर २ दिवसांचा विशेष ब्लॉक; वाहतुकीत अनेक बदल; कसं असणार वेळापत्रक?
मुंबई : मध्य रेल्वे मार्गावर दोन दिवसांचा विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. ८ मार्च (शनिवार) आणि ९ मार्च (रविवार) रोजी कसारा स्थानकावर आरओबी गर्डरच्या (टप्पा-१) लाँचिंगसाठी विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. दोन दिवसांचा ब्लॉक असल्यामुळे लोकलसेवेवर परिणाम होणार असून प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे. प्रवाशांनी शनिवार आणि रविवारचं वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडावं, असं आवाहन मध्य रेल्वेकडून करण्यात आलं आहे.
पहिला ब्लॉक ८ मार्चला शनिवारी सकाळी ११.४० वाजल्यापासून ते दुपारी १२.१० वाजेपर्यंत कसारा स्थानक हद्दीतील अप आणि डाउन ईशान्य मार्गांवर असणार आहे. तर दुसरा आणि तिसरा ब्लॉक ९ मार्च म्हणजे रविवार सकाळी ११.४० वाजल्यापासून ते दुपारी १२.१० वाजेपर्यंत आणि दुपारी ४ वाजल्यापासून ते संध्याकाळी ४.२५ वाजेपर्यंत कसारा स्थानक हद्दीतील अप आणि डाउन ईशान्य मार्गांवर घेण्यात येणार आहे.
कसारा येथून शनिवार आणि रविवार सकाळी ११.१० वाजता सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (एन-१६) लोकल ट्रेन आसनगाव येथून सुटेल. कसारा येथून रविवारी ४.१६ वाजता सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (एन-२६) लोकल कल्याण येथून सुटेल. हे मेगा ब्लॉक्स पायाभूत सुविधांच्या देखभाल आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहेत. प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे अशी विनंती रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येत आहे.