मुंबईचा राजा घडवणारे मूर्तिकार गजानन देऊ तोंडवळकर यांचे निधन
Mumbaicha Raja Ganeshgalli in Marathi: गेल्या 13 वर्षापासून मुंबईचा राजा म्हणजेच गणेश गल्लीचा भव्य दिव्य गणपतीची मुर्ती साकारणारे गजानन देऊ तोंडवळकर (अण्णा) यांचे मालवण तालुक्यातील त्यांच्या पेंडूर या गावी प्रदीर्घ आजाराने दुःखद निधन झाले. मुंबईच्या गणेशोत्सवाची शान समजल्या जाणाऱ्या गणेश गल्लीतील मुंबईच्या राजाची मूर्ती सलग १३ वर्षे घडवणारा अवलिया मूर्तीकार हरपल्याने मूर्तिकार आणि सार्वजनिक मंडळांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.
बृहन्मुंबई गणेश मूर्तिकार संघटनेचे अध्यक्ष मूर्तिकार गजानन तोंडवळकर उर्फ अण्णा तोंडवळकर यांचे दीर्घ आजाराने मालवण तालुक्यातील पेंडुर या गावी निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी शारदा, मुलगा निलेश, सून, मुली, जावई आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. मूर्तिकार गजानन तोंडवळकर यांनी गणेशगल्लीतील लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळाची सलग १३ वर्षे भव्य लक्षवेधी गणेशमूर्ती साकारली.
तसेच त्यांनी गणेशगल्ली, रंगारी बदक चाळ, उमरखाडी, जाखादेवी मंडळ, प्रभादेवी आदी विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये साकारलेले आकर्षक देखावे विशेष गाजले होते. तसेच त्यांनी नवरात्रौत्सवात साकारलेल्या कालिमाता, अंबामाता, महिषासुर मर्दिनी, आई तुळजाभवानीच्या रूपातील देवीच्या मूर्तीही लक्षवेधी होत्या. विशेष बाब म्हणजे आजारपणाच्या काळातही तोंडवळकर यांनी गणेशमूर्ती व देवीच्या मूर्ती साकारल्या. बृहन्मुंबई गणेश मूर्तिकार संघटनेच्या माध्यमातून त्यांनी मूर्तिकारांचे विविध प्रश्नही राजकीय मंडळींसमोर मांडून त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या निधनाने गणेश मूर्तिकला क्षेत्रातील अव्वल तारा हरपल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे. त्यांचे पार्थिव मुंबईला राहत्या घरी आणण्यात आले असून सकाळी 8 वाजता भोईवाडा येथील त्यांच्या घरून अंत्य यात्रा निघाली.