आता सत्य शोधून काढणे होणार सोपं; नव्या संशोधनातून अचूक उत्तर मिळणार
मुंबई / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : अनेकवेळा सत्य जाणून घेण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. शिवाय सत्य जाणून घेण्यासाठी असलेल्या प्रक्रियेत माहितीही अपूर्ण मिळते. अशावेळी योग्य तंत्रज्ञान वापरून सत्य जाणून घेता येऊ शकते व हे तंत्रज्ञान कोणत्या पध्दतीने प्रभावी ठरू शकते यावर आयआयटी मुंबईच्या संशोधकांनी विशेष अभ्यासाच्या माध्यमातून शोधनिर्मिती केली आहे. आयआयटी मुंबईच्या डॉ. अनुज वोरा आणि प्रा. अंकुर कुलकर्णी यांनी केलेल्या या अभ्यासात असे आढळले की, एका प्रश्नाच्या पर्यायांची संख्या मर्यादित ठेवल्यास अधिक प्रामाणिक आणि अचूक उत्तर मिळू शकते.
संशोधनानुसार, निवडक पर्याय देऊन विचारलेल्या प्रश्नांमधून प्राप्त झालेली माहिती अधिक विश्वासार्ह ठरते. हा अभ्यास कोविड-१९ दरम्यान, आढळलेल्या परिस्थितीवर आधारित आहे. त्या काळात आरोग्य अधिकाऱ्यांना प्रवाशांकडून त्यांचा प्रवास इतिहास जाणून घ्यायचा होता, परंतु अनेक प्रवासी काही माहिती लपवण्याचा प्रयत्न करत. जर आरोग्य अधिकाऱ्यांनी संभाव्य प्रवास स्थळांची मोठी यादी दिली, तर प्रवाशांना खोटे सांगणे सोपे जात होते.
याचा प्रत्यक्ष उपयोग कसा?
संशोधनात असेही दिसून आले की, काही वेळा संवादात अडथळे किवा ‘नॉईज’ येऊ शकतो, जसे की संदेश पाठवताना अक्षरे बदलली जातात आणि त्यामुळे चुकीची माहिती मिळते. त्यामुळे, मिळालेल्या उत्तरांतील अचूक माहिती ओळखण्यासाठी योग्य प्रश्नावली आणि संवाद तंत्रज्ञान विकसित करणे आवश्यक आहे. या संशोधनाला भारत सरकारच्या विज्ञान व अभियांत्रिकी संशोधन मंडळ आणि विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचा पाठिंबा मिळाला आहे. या संशोधनाचा उपयोग भविष्यात राष्ट्रीय सुरक्षा, बाजार संशोधन आणि धोरणात्मक निर्णय प्रक्रियेत होऊ शकतो, असे मत व्यक्त करण्यात आले आहे.
विविध क्षेत्रांत होऊ शकतो उपयोग
ही संकल्पना केवळ आरोग्य क्षेत्रापुरती मर्यादित नसून, करचोरी, आर्थिक व्यवहारांचा मागोवा घेणे, गुप्तचर माहिती गोळा करणे आणि राजनैतिक वाटाघाटी यांसारख्या अनेक क्षेत्रांसाठी उपयुक्त ठरू शकते. कर तपासणी अधिकाऱ्यांना मोठ्या आर्थिक व्यवहारांचे साखळी स्वरूपात विश्लेषण करायचे असेल, तर योग्य प्रकारे निवडक पर्याय दिल्यास अधिक विश्वासार्ह माहिती मिळू शकते.
‘माहिती निष्कर्षण क्षमता’चा नवा सिद्धांत
संशोधकांनी ‘माहिती निष्कर्षण क्षमता’ या संकल्पनेचा अभ्यास केला. यात, मर्यादित पर्यायांद्वारे प्रश्न विचारल्यास गैर-सहकारी माहिती देणाऱ्याकडूनही जास्तीत जास्त सत्य उघड करता येते, असे आढळले. तसेच, काही प्रश्नांची संरचना योग्य नसेल, तर जरी माहिती देणारा सहकार्य करत असला, तरी देखील अर्धवट किवा चुकीची माहिती मिळू शकते.