
पद्मसिंह पाटील यांच्या अडचणींत होणार वाढ; पवनराजे निंबाळकर खून खटल्यातील निर्दोष सुटकेला आव्हान
मुंबई : काँग्रेस नेते पवनराजे निंबाळकर आणि त्यांच्या चालकाच्या दोन दशकांपूर्वी झालेल्या हत्येप्रकरणी विशेष सीबीआय न्यायालयाने या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि डॉ. पद्मसिंह पाटील (वय ८६) यांच्यासह अन्य आरोपींची निर्दोष सुटका केली होती. त्या निर्णयाला निंबाळकर कुटुंबीयांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. न्यायालयाने त्यांच्या अपिलाची दखल घेऊन पाटील आणि इतर आरोपींना नोटीस बजावली आहे.
निंबाळकर हत्याप्रकरणातील मूळ तक्रारदार आणि शिवसेनेचे धाराशिव येथील खासदार ओमराजे निंबाळकरांच्या आई आनंदीदेवी यांनी पाटील यांच्या निर्दोषत्वाला आव्हान दिले असून, अपिलावर न्या. अजय गडकरी आणि न्या. कमल खाता यांच्या खंडपीठापुढे मंगळवारी सुनावणी झाली. तेव्हा, सर्व प्रतिवादींना नोटीस बजावून भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले. पाटील आणि पवनराजे हे राजकीय प्रतिस्पर्धी होते हे सिद्ध झाले आहे, त्यांनी एकमेकांविरुद्ध विविध तक्रारी आणि प्रति तक्रारी दाखल केल्या होत्या. असे असले तरी पाटील हे या हत्या प्रकरणाचे मुख्य सूत्रधार होते हे सिद्ध करण्यात सीबीआय अपयशी ठरली आहे, अशी टिप्पणी करून विशेष न्यायालयाचे न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांनी निकालात नमूद केले होते.
माफीचा झालेल्या पारसमल जैनची साक्ष खटल्यात महत्त्वपूर्ण पुरावा म्हणून सादर करण्यात आली होती. परंतु, ताब्यात घेतल्यानंतर जैनला १५ दिवस बेकायदेशीर कोठडीत ठेवून त्यांचा छळ करण्यात आला होता. त्यामुळे, ती संशयास्पद आहे, असेही निकालपत्रात अधोरेखीत करून विशेष न्यायालयाने पद्मसिंह पाटील यांच्यासह सतीश मंदाडे, मोहन शुक्ला, शशिकांत कुलकर्णी, कैलास यादव, दिनेश तिवारी, पिंटू सिंग आणि छोटे पांडे यांचीही संशयचा फायदा देऊन निर्दोष सुटका केली होती.
सीबीआयवर आरोप
सीबीआयने पाटील आणि अन्य आरोपींविरुद्धचा गुन्हा सिद्ध करण्यासाठी आवश्यक व सबळ पुरावेच सादर केले नाहीत. हा खटला मुख्यत्त्वे माफीचा साक्षीदार झालेल्या आरोपीच्या कबुलीजबाबावर आधारित होता. परंतु, त्याचे कबुलीजबाब दबावाखाली घेतल्याचे आणि त्याने सतत कबुलीजबाब बदल्याने त्यात मोठ्या प्रमाणात विसंगती आढळून आल्या आहेत. परिणामी, संशयाचा फायदा देऊन पाटील यांच्यासह सर्व आरोपींना निर्दोष ठरवण्यात येत असल्याचे विशेष न्यायालयाचे न्यायाधीश सत्य नावंदर यांनी निकालात नमूद केले होते.