पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणात सर्व नऊ आरोपी निर्दोष ; धाराशिवमध्ये पद्मसिंह पाटील समर्थकांचा जल्लोष
धाराशिव, जिल्हा प्रतिनिधी : राज्यभर गाजलेल्या आणि धाराशिवच्या राजकारणाला दीर्घकाळ प्रभावित करणाऱ्या पवनराजे निंबाळकर व त्यांचा कारचालक हत्या प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयाने सर्व नऊ आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. तब्बल दोन दशके सुरू असलेल्या या खटल्यात आरोप सिद्ध करण्यासाठी पुरेसे आणि विश्वासार्ह पुरावे नसल्याचे नमूद करत न्यायालयाने आरोपींना संशयाचा फायदा दिला.
३ जून २००६ रोजी मुंबई येथे पवनराजे निंबाळकर व त्यांचा कारचालक समद काजी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात माजी मंत्री डॉ.पद्मसिंह पाटील यांच्यासह अन्य आरोपींवर कट रचल्याचे आणि हत्येची सुपारी दिल्याचे आरोप करण्यात आले होते. या प्रकरणामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती.
न्यायालयाने आपल्या निकालात माफीच्या साक्षीदाराची साक्ष विश्वासार्ह नसल्याचे नमूद केले. तसेच तपासादरम्यान नोंदविण्यात आलेल्या काही जबाबांमधील विसंगती, बदललेली विधाने आणि तपास प्रक्रियेतील त्रुटींचाही उल्लेख केला. उपलब्ध पुराव्यांच्या आधारे आरोपींविरुद्धचे आरोप संशयाच्या पलीकडे सिद्ध होत नसल्याने सर्व नऊ आरोपींना निर्दोष मुक्त करण्यात आले.
या प्रकरणाच्या तपासादरम्यान माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांना अटक करण्यात आली होती. तत्कालीन खासदार असलेल्या पाटील यांनी २००९ मध्ये काही काळ तुरुंगवासही भोगला होता. मात्र, दीर्घ न्यायालयीन सुनावणीनंतर अखेर न्यायालयाने त्यांच्यासह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली. यावेळी न्यायालयात पद्मसिंह पाटलांचे दोन्ही पुत्र आमदार राणाजगजितसिंह, पृथ्वीराज आणि नातू मल्हार आणि जय उपस्थित होते. तर दुसऱ्या बाजूला स्व. पवन राजे यांचे दोन्ही पुत्र खासदार ओम राजे व जय राजे यांच्यासह स्व. समद काजी यांची आई आणि पत्नी उपस्थित होत्या.
न्यायालयाचा निकाल जाहीर होताच धाराशिव शहरासह जिल्ह्यात पद्मसिंह पाटील आणि राणा पाटील यांच्या समर्थकांनी जल्लोष साजरा केला. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, प्रतिष्ठान भवन यासह अन्य ठिकाणी फटाके फोडून, मिठाई वाटून आणि घोषणाबाजी करत समर्थकांनी आनंद व्यक्त केला.
निकाल दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया खाससार ओमराजे निंबाळकर यांनी दिली आहे. संविधान व न्यायालयावर आपला विश्वास असल्याचे स्पष्ट करत यानंतर आपण मतदारसंघातील जनतेशी चर्चा करून आगामी धोरण ठरवणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. आपली राजकीय भूमिका आणि न्यायालयाचा निकाल याचा अर्थाअर्थी कांही संबंध नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले असून या प्रकरणी उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
पवनराजे निंबाळकर हत्याकांडातील निकाल धक्कादायक; उच्च न्यायालयात अपील करणार – तानाजी जाधवर
तर, निकालानंतर जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चना पाटील यांनी प्रतिक्रिया देताना, “आज सत्याचा विजय झाला आहे. गेल्या वीस वर्षांत आमच्या कुटुंबाला राजकीय आणि मानसिक त्रास सहन करावा लागला. न्यायालयाच्या निर्णयामुळे सत्य समोर आले आहे,” असे सांगितले.
पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरण हे गेल्या दोन दशकांपासून धाराशिव जिल्ह्याच्या राजकारणातील सर्वाधिक चर्चेतील आणि संवेदनशील प्रकरणांपैकी एक राहिले आहे. मुंबई सत्र न्यायालयाच्या या निकालामुळे दीर्घकाळ सुरू असलेल्या न्यायालयीन लढतीचा शेवट झाला असला, तरी या निर्णयाचे राजकीय परिणाम आगामी काळात जिल्ह्यातील राजकीय समीकरणांवर दिसून येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.






