रेड लाईट एरिया, लाईव्ह ऑर्केस्ट्रा, डान्स बार, बारमध्ये बांगलादेशींची शक्यता
नवी मुंबई : नवी मुंबई पोलिस आयुक्तालय हद्दीत अनेक ठिकाणी रेड लाइट एरिया, तसेच लाईव्ह ऑर्केस्ट्रा, डान्स बार, सर्व्हिस बार आहेत. यात देखील बांगलादेशी नागरिकांची घुसखोरी झाल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. त्यामुळे या व्यवसायांची देखील कसून तपासणी होणे गरजेचे आहे. या व्यवसायात सामील असलेल्या अनेक बांगलादेशी महिला सापडण्याची शक्यता आहे.
दैनिक ‘नवराष्ट्र’च्या बांगलादेशी विरोधी मालिकानंतर नवी मुंबई पोलिस अलर्ट झाले होते. पोलिस आयुक्तांनी या वृत्ताची दखल घेतली होती. त्यानुसार बांगलादेशी नागरिकांवर कारवाईस सुरुवात झाली होती. सध्या या मोहिमेला वेग आलेला आहे. पोलिस विभागाने शहरातील विविध ठिकाणी असलेल्या झोपडपट्टी, गावठाण भाग, या ठिकाणी छापेमारी करून आत्तापर्यंत, भारतात घुसखोरी करून बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या हजारो बांगलादेशी नागरिकांची धरपकड केली आहे. त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत. तर अनेक नागरिकांना स्वगृही पाठवण्यात पोलिसांना यश आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या मोहिमेचे मोहिर कौतुक केले आहे.
पोलिसांच्या या सतर्कतेचे नवी मुंबईकरांकडून कौतुक होत आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करण्यात आला होता. त्यातील हल्लेखोर हा बांग्लादेशी असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले होते. त्यामुळे अशाप्रकारे बेकायदेशीर बांगलादेशी नागरिकांवर कारवाई करण्याची मागणी देशभरातून, राज्यातून होऊ लागली.
नवी मुंबई पोलिस आयुक्तालय हद्दीत देखील अनेक रेड लाईट एरिया, लाईव्ह ऑर्केस्ट्रा बार, डान्स बार, सर्विस बार चालतात. मुंबईच्या धर्तीवर नवी मुंबई पोलिसांनी देखील अशा अवैध धंद्यांवर तसेच रेड लाइट एरियावर देखील धाड टाकणे गरजेचे आहे. यात देखील बांगलादेशींचा सहभाग उघड होण्याची दाट शक्यता आहे. बार मालकांकडून त्यांच्याकडे काम करणाऱ्या महिला कामगारांची ओळखपत्रे घेऊन ती खरी आहे का याबाबत तपासणी करण्याची गरज आहे.
कारवाईची मागणी
मुंबई पोलिसांनी कामाठीपुरा या रेड लाईट एरियामधून एका बांगलादेशी महिलेला ताब्यात घेतले. ती महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असल्याची धक्कादायक बाब तपासात उघड झाली होती. त्यामुळे या बांगलादेशी नागरिकांसोबत त्यांना बनावट कागदपत्रे बनवून देणारे, तसेच त्यांना आसरा देणारे जे कोणी असतील त्यांच्यावर देखील कठोर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.
कागदपत्रे पाहून दोषींवर गुन्हे दाखल
गेल्या एक महिन्यात हजारोंच्या वर बांगलादेशी नागरिकांची धरपकड करण्यात आली आहे. त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करून दोषींवर गुन्हे दाखल करून त्यांना त्यांच्या देशात परत पाठवले जाईल, अशी माहिती पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी दिली. नवी मुंबई पोलिसांनी देखील रेड लाईट एरिया, ऑर्केस्ट्रा बार, डान्सबार, सर्विस बार अशा ठिकाणी छापेमारी केली तर त्यांनी केलेल्या कारवाईच्या संख्येत निश्चित वाढ होईल. त्यामुळे सुरक्षेत आणखी भर पडेल.