
राज्यातील तुरुंगांमध्ये क्षमतेच्या 140 टक्के कैदी; 60 तुरुंगांमध्ये 38 हजारांहून अधिक कैदी
मुख्य न्यायमूर्ती महेश चंद्र त्रिपाठी आणि न्यायमूर्ती अद्वैत सेठना यांच्या खंडपीठासमोर झालेल्या सुनावणीवेळी तुरुंग महासंचालक सुहास वारके यांनी प्रतिज्ञापत्र सादर केले. राज्यातील एकूण कैद्यांमध्ये ३१ हजार ८२१ कच्चे कैदी, सहा हजार २४८ दोषी ठरलेले कैदी आणि ४४६ स्थानबद्ध व अन्य श्रेणीतील कैद्यांचा समावेश आहे.
शिक्षण, आरोग्य आणि पुनर्वसनावर भर
तुरुंग प्रशासनाने कैद्यांना पौष्टिक अन्न, शुद्ध पाणी, आरोग्य सुविधा, कायदेशीर मदत आणि समुपदेशन उपलब्ध करून दिल्याचे म्हटले आहे. राज्यातील ४५ तुरुंगांमध्ये १५ ग्रंथालये असून, त्यात सुमारे ७५ हजार ७१५ पुस्तके आहेत. २०१४ पासून २ हजार ८९५ कैद्यांनी तुरुंगातूनच शिक्षण पूर्ण केले आहे. कैद्यांना शिवणकाम, सुतारकाम, बेकरी, शेती आणि संगणक प्रशिक्षणही दिले जाते.
मानसिक आरोग्यासाठी समुपदेशन, योग, ध्यान आणि क्रीडा उपक्रम राबविले जात आहेत. गरजू कैद्यांना जामिनासाठी आर्थिक मदत देण्याच्या योजनेतून १९ एप्रिल २०२६ पर्यंत २६० कैद्यांना लाभ मिळाला आहे. दरम्यान, खुल्या कारागृहांची एकूण क्षमता ३ हजार ३०७ असताना तेथे १ हजार ९३५ कैदी आहेत. कैद्यांचे पुनर्वसन, सुटकेनंतर रोजगार व निवाऱ्याची उपलब्धता आणि समाजात पुनर्समावेश यासाठीही विविध उपक्रम राबविले जात असल्याचे प्रशासनाने प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे.
‘ई-मुलाखती’मुळे संवाद सुलभ
आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे न्यायालयीन कामकाज आणि कुटुंबातील सदस्यांशी होणारा संवाद सुलभ झाला आहे. २०२५ मध्ये ४.५४ लाखांहून अधिक ‘ई-मुलाखती’ घेण्यात आल्या, तर मे २०२६ पर्यंत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर राहण्याचे प्रमाण ९६ टक्क्यांवर पोहोचले. याव्यतिरिक्त, कारागृहांमध्ये १९६ ‘ई-कियोस्क’ यंत्र कार्यरत आहेत. गरजू कैद्यांना जामिनासाठी आर्थिक मदत देणाऱ्या योजनेअंतर्गत २६० कैद्यांना दिलासा मिळाला आहे.
कारागृहामंध्ये १०१ वॉटर कूलर
कैद्यांचे आरोग्य, स्वच्छता आणि शिक्षण यांना चालना देण्यासाठी कारागृहांमध्ये २०१ वॉटर कूलर प्युरिफायर्स आणि ९२ वॉशिंग मशीन्स बसवण्यात आल्या आहेत, तसेच १८१ नवीन प्युरिफायर युनिट्स बसवण्याची प्रक्रिया सुरू आहे. याव्यतिरिक्त, २०१४ पासून ४५ कारागृहामधील १५ ग्रंथालयांमध्ये उपलब्ध असलेल्या ७५७१५ पुस्तकांचा लाभ घेऊन २८९५ कैद्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले आहे.