"सरकारची सत्ता विधानभवनात, आमची रस्त्यावर...", राज ठाकरेंचा इशारा (फोटो सौजन्य-X)
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Marathi : महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे तब्बल 20 वर्षांनंतर एकत्र व्यासपीठावर पाहायला मिळाले. महाराष्ट्र सरकारने हिंदी सक्तीचा जीआर रद्द केल्यानंतर याचा जल्लोष करण्यासाठी वरळी डोम येथे ठाकरे गट आणि मनसे पक्षाकडून विजयोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर दोन्ही बाजूंनी ठाकरे बंधूंनी प्रवेश करत एकत्र येऊन एकमेकांची भेट घेतली. याचदरम्यान राज ठाकरे यांनी भाषणाची सुरुवात करताना थेट राज्य सरकारला इशारा दिला. यावेळी थेट राज ठाकरे यांनी सुनावलं आहे.
हिंदी सक्तीबाबत बोलताना राज ठाकरे म्हणाले कुणालाही न विचारता हिंदी सक्ती कशासाठी? तुमच्याकडे सत्ता आहे म्हणून का? तुमची सत्ता विधानभवनात. इथं रस्त्यावर आमची सत्ता आहे, असे राज ठाकरे यांनी सुनावलं. तसेच “आता सर्वच चॅनेलचे कॅमेरे इकडे लागले तिकडे लागले. आता संध्याकाळी सगळं सुरू होईल. काय वाटतं काय,. दोघांची बॉडी लँग्वेज कशी होती. कोणी कमी हसलं का. बोलतायत का. आपल्याकडे इतर विषय सोडून इतर गोष्टीत रस असतो अनेकांना. आजचा हा मेळावा. मोर्चालाही तीच घोषणा होती. आताही तिच आहे. कोणताही झेंडा नाही. मराठी हाच अजेंडा. माझ्या मराठीकडे, महाराष्ट्राकडे वेड्यावाकड्या नजरेने पाहायचं नाही कुणी,” असं राज ठाकरे म्हणाले. आम्ही शांत आहोत, म्हणजे आम्ही #@$ डू आहे, असा गैरसमज करू नये…असं देखील राज ठाकरे यांनी सांगितले.
हिंद प्रांतावर १२५ वर्षे मराठ्यांनी राज्य केले. आम्ही कधी मराठी लादली का? गुजरात, मध्य प्रदेश, पंजाब कुठेही मराठी लादली नाही. हिंदी भाषा २०० वर्षांपूर्वीची भाषा आहे. महाराजांच्या काळातही ती भाषा नव्हती. कुणासाठी आणि कशासाठी काय करायचं आहे नेमकं? यांनी फक्त चाचपडून पाहायलं. मुंबई स्वातंत्र्य करता येतेय का? त्यासाठी चाचपडून टाकलं. महाराष्ट्राला, मुंबईला हात घालून दाखवावे. आम्ही सांगतोय याचा अर्थ …डू नाही. काहीही अंगावर लादायचा प्रयत्न करता. माघार घेतलं त्याचं काय करायचं. वेगळ्या ठिकाणी सगळं प्रकरण वळवा. ठाकरेंची मुलं इंग्रजीमध्ये शिकली. पुढे काय? कुठे काय शिकलो याचा काय संबंध? असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला.