19 वर्षांचा वनवास संपणार; राज-उद्धव आज एकत्र येणार!
संपूर्ण मुंबईकरांसह राज्यभरातील शिवसैनिक आणि मनसैनिक ज्या दिवसाची वाट पाहत होते तो दिवस आज उजाडला आहे. मुंबईतील वरळी डोममध्ये आज (५ जुलै) माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्ध ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे एकत्र येणार आहेत. तब्बल १९ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर वरळी डोममध्ये रविवारी ऐतिहासिक दृश्य पाहायला मिळणार आहे.
मराठी अस्मितेच्या एकतेसाठी लाखो लोक ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याला ‘याची देही, याची डोळा’ पाहण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून जनसागर लोटल्याचे पाहायला मिळत आहे.या मेळाव्याचे केंद्रबिंदू फक्त ठाकरे बंधू नव्हे, तर मराठी माणसाचा स्वाभिमान, संस्कृती आणि एकजूट असल्याचे मानले जात आहे. डोमच्या आत उसळलेली गर्दी आणि टाळ्यांच्या गजरात उमटणारे ‘जय महाराष्ट्र’चे घोष यामुळे वातावरण भारून गेल्याचे पाहायला मिळत आहे.आज ठाकरे बंधू एकत्र येत आहेत, यापेक्षा जास्त महत्त्वाचं म्हणजे आज मराठी बाणा एकत्र येतोय, ही भावना उपस्थितांमध्ये स्पष्ट जाणवली. “आमचं स्वप्न पूर्ण झालं,” असे सांगताना अनेकांच्या डोळ्यांत आनंदाश्रूही होते.
वरळी डोमबाहेर ठाकरे बंधूंच्या ऐतिहासिक विजयी मेळाव्यासाठी अभूतपूर्व गर्दी झाली आहे. गेटवर जनसागर उसळला असून, या गर्दीतून मार्ग काढणे नेत्यांनाही कठीण झाले आहे. मनसे आणि शिवसेनेचे अनेक नेते गर्दीत अडकले असून, काहींचा प्रवेश थांबलेला आहे. मनसेचे अविनाश जाधव आणि शिवसेनेचे प्रकाश महाजन हे दोघेही गेटवर अडकल्याचे दृश्य पाहायला मिळाले. पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला असला, तरी कार्यकर्त्यांचा उत्साह आणि गर्दीचा रेटा इतका होता की नियंत्रण राखणे कठीण झाले.
डोममध्ये प्रवेश मिळावा यासाठी कार्यकर्त्यांत चढाओढ सुरू होती. पोलिसांनी कसाबसा मार्ग काढून काही प्रमुख नेत्यांना आत घेतलं, मात्र अजूनही शेकडो कार्यकर्ते बाहेरच अडकून आहेत.ही गर्दी केवळ राजकीय मेळाव्याची नसून, मराठी अस्मितेच्या एका महान क्षणाची साक्ष देणारी असल्याच्या भावना व्यक्त केल्या जात आहेत.
वरळी येथे होणाऱ्या मराठी विजयी मेळाव्यासाठी पालघरहून निघालेल्या मनसे कार्यकर्त्यांना मुंबई पोलिसांनी अडवलं आहे. दादर परिसरात पोलिसांनी पालघर जिल्हाध्यक्ष तुलसी जोशी यांच्यासह काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं असून, यामुळे खळबळ उडाली आहे.
600 दशलक्ष वर्षांपूर्वी एक दिवस 21 तासांचाच होता! वैज्ञानिकांनी लावला थक्क करणारा शोध
मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण मुंबईत कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. महत्त्वाच्या चौकाचौकांमध्ये पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. मात्र, मनसैनिकांना नेमकं कोणत्या कारणास्तव ताब्यात घेतलं, याबाबतची अधिकृत माहिती अद्यापही समोर आलेली नाही.
या कारवाईमुळे मनसे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असून, पोलिसांच्या भूमिकेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. वरळीच्या दिशेने मोठ्या प्रमाणात मनसैनिकांची हालचाल सुरू असल्यामुळे पोलिसांनी कोणतीही अनिष्ट घटना घडू नये म्हणून खबरदारी घेतल्याची शक्यता वर्तवली जात आहे.