
रुग्णालयाच्या आवारात ‘नवरंगा’ची हजेरी; कस्तुरबात दुर्मिळ इंडियन पिट्टाचे दर्शन!
डॉ. मंगेश पवार हे नायर रुग्णालयातील प्लास्टिक सर्जन असून त्यांना कस्तुरबातील बर्न वॉर्डमध्ये ड्युटी लागते. त्याप्रमाणे ते तिकडे गेले असता शनिवारी सकाळी डॉ पवार यांना नवरंगाचे दर्शन झाले. डॉ. पवार हे पक्षी निरीक्षक असून राज्यात ठिकाठिकाणी जाऊन पक्षी अभ्यास करत असतात. मात्र कस्तुरबातील नवरंगा दर्शनाने शहरातील झाडे, हिरवळ आणि पक्ष्यांसाठी अनुकूल नैसर्गिक अधिवास टिकवण्याचे महत्त्व पुन्हा अधोरेखित केले आहे. काँक्रीटच्या जंगलातही निसर्गाने आपले अस्तित्व जपले असल्याची सुखद जाणीव ‘नवरंगा’ने करून दिली आहे.
इंडियन पिट्टा हा आपल्या बहुरंगी पिसाऱ्यामुळे ‘नवरंग’ म्हणून ओळखला जातो. हिरवा, निळा, पिवळा, नारिंगी, लाल आणि काळ्या रंगांच्या आकर्षक छटांनी नटलेला हा पक्षी दिसायला अत्यंत देखणा असतो. प्रामुख्याने दाट झाडी आणि जंगल परिसरात आढळणारा हा पक्षी मुंबईच्या गजबजलेल्या मध्यवर्ती भागातील रुग्णालयाच्या आवारात दिसणे विशेष लक्षवेधी ठरले आहे.
इंडियन पिट्टा हा प्रामुख्याने केरळ आणि श्रीलंकेत आढळणारा पक्षी आहे. कोकण आणि पश्चिम घाट परिसरातही त्याचे दर्शन क्वचितच घडते. सध्या या पक्ष्याचा स्थलांतराचा काळ सुरू असून तो मुंबईच्या जवळपासच्या कर्नाळा परिसरापर्यंत येतो. मात्र, कर्नाळ्यापलीकडे थेट मुंबईच्या मध्यवर्ती भागातील कस्तुरबा रुग्णालयाच्या आवारात त्याचे दर्शन घडणे ही विशेष बाब असल्याचे डॉ. पवार म्हणाले. महानगरातील पक्ष्यांचे स्थलांतर, त्यांचा अधिवास आणि पर्यावरणीय बदलांच्या दृष्टीने या नोंदीचा अभ्यास होणे महत्त्वाचे ठरणार आहे.
‘मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरात इंडियन पिट्टा दिसेल आणि तोही कस्तुरबा रुग्णालयाच्या आवारात, याची अजिबात कल्पना नव्हती. रुग्णालयाच्या रोजच्या कामाच्या व्यापात अचानक या नऊ रंगांच्या पाहुण्याचे दर्शन घडले. त्याचे रंग आणि देखणेपणा पाहून क्षणभर नजरच हटत नव्हती. निसर्ग आपल्याला अशा अनपेक्षित क्षणी आनंदाची भेट देतो, याचा हा अविस्मरणीय अनुभव आहे.’ अशी माहिती नायर रुग्णालयातील प्लास्टिक सर्जन डॉ. मंगेश पवार यांनी दिली.
Ans: इंडियन पिट्टा हा रंगीबेरंगी पिसांसाठी ओळखला जाणारा पक्षी आहे. त्याला मराठीत ‘नवरंगा’ असेही म्हटले जाते.
Ans: मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयाच्या आवारात या दुर्मिळ पक्ष्याचे दर्शन झाले.
Ans: प्लास्टिक सर्जन डॉ. मंगेश पवार यांच्या निरीक्षणामुळे या पक्ष्याच्या उपस्थितीची माहिती समोर आली. त्यामुळे पक्षीनिरीक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली.