
भविष्यातील आव्हाने अन् शाश्वत विकास; मुंबईसाठी महायुतीचा मास्टर प्लॅन
मुंबईच्या विकासाचा कणा वाहतूक व्यवस्थेला मानले जाते. महायुतीने ‘इंटिग्रेटेड ट्रान्सपोर्ट सिस्टीम’वर भर दिला. त्यांच्या कार्यकाळात अनेक प्रकल्पांना गती मिळाल्याचे सांगितले जाते. फक्त गती नव्हे तर एक कालबद्ध पद्धतीने ते पूर्ण करण्यासाठी धोरण ठरले गेले. परिणामी ते पुर्णत्वास देखील आले, असंही महायुतीचा दावा आहे.
मुंबई आणि नवी मुंबईला जोडणारा ‘अटल बिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतू’. राज्याच्या प्रगतीचा महामार्ग ठरला. २१.८ किलोमीटर लांबीचा देशातील सर्वात लांब सागरी सेतू दक्षिण मुंबईतून थेट नवी मुंबई आणि तिथून पुढे पुणे-गोवा महामार्गाशी कनेक्टिव्हिटी वाढवतो. त्यासोबतच दक्षिण मुंबईतील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी व नरिमन पॉइंट ते कांदिवली असा विनाअडथळा प्रवास करण्यासाठी ‘कोस्टल रोड’ प्रकल्पाची आखणी झाली. पर्यावरणीय आव्हाने व तांत्रिक अडचणींवर मात करत हा प्रकल्प मुंबईकरांचा प्रवास सुसह्य करत आहे.
मेट्रोचे जाळे विणण्याचे स्वप्न देखील पुर्ण होत असून, मेट्रो-३ (कुलाबा-वांद्रे-सीप्झ) या भूमिगत मेट्रोपासून ते मेट्रो-२ए आणि मेट्रो-७ या मार्गांपर्यंत, मुंबईच्या उपनगरांना जोडण्यासाठी मेट्रोचे जाळे अत्यंत वेगाने विस्तारले जात आहे. लाखो मुंबईकर या मेट्रो सेवेचा लाभ घेऊ लागले आहेत. वाहतूक व्यवस्थेसोबत आर्थिक क्षमता वाढवणे देखील गरजेचे होते. त्यानुसार मुंबईला ‘ग्लोबल फायनान्शिअल हब’ बनवण्यासाठी दूरगामी पावले उचलली गेली. मुंबईत दुसऱ्या विमानतळाची गरज होती. यानुसार नवी मुंबईतील विमानतळ प्रकल्प त्याचाच महत्त्वाचा भाग आहे. या प्रकल्पामुळे नवी मुंबई आणि रायगड परिसराचा विकास झाला असून, तिथे रोजगाराच्या लाखो संधी निर्माण होत आहेत.
मुंबईला आशियातील सर्वात मोठे ‘डेटा सेंटर हब’ बनवण्यासाठी महायुती सरकारने विशेष सवलती आणि धोरणे राबवली. यामुळे जगातील मोठ्या तंत्रज्ञान कंपन्यांनी मुंबईत आपली कार्यालये आणि सर्व्हिस सुरू केले, ज्यामुळे मुंबईची ओळख आता ‘फिनटेक सिटी’ म्हणून होत आहे. जगातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीचा कायापालट करण्याचे स्वप्न होते. त्याला आता कायदेशीर व आर्थिक स्वरूप देण्यात आले. या पुनर्विकास प्रकल्पामुळे तिथल्या रहिवाशांना हक्काचे घर आणि रोजगाराची नवीन साधने मिळणार आहेत. तसेच बीडीडी चाळींचा पुनर्विकास करून मध्यमवर्गीय मुंबईकरांना न्याय देण्याचे काम त्यांच्या नेतृत्वाखाली झाले.
वॉटर टॅक्सी आणि जलवाहतूक
मुंबईची दुसरी ओळख म्हणजे, समुद्रकिनारा. पण, या समुद्री किनाऱ्याचा वापर तितकासा नव्हता. सरकारने जलवाहतुक हा पर्याय निर्माण केला. वॉटर टॅक्सी आणि रो-रो फेरी सेवा सुरू केल्याने मुंबई-नवी मुंबई व अलिबाग अगदीच सोपे झाले, हे प्रकल्प मुख्यमंत्री फडणवीस यांचे व्हिजन म्हणून ओळखले जातात. मंत्रालयातून ‘मुख्यमंत्री वॉर रूम’ स्थापन करून हे प्रकल्प राबविले गेले.
भविष्यातील आव्हाने आणि शाश्वत विकास
केवळ काँक्रीटचे जंगल न उभारता, मुंबईला शाश्वत शहर बनवण्यावरही भर दिला जात आहे. ‘इलेक्ट्रिक बस’ वाढवणे, किनारपट्टीचे रक्षण करणे आणि सांडपाण्यावर प्रक्रिया करणारे मोठे प्रकल्प (STP) राबवून समुद्राचे प्रदूषण कमी करणे, यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. मुंबईच्या वाढत्या लोकसंख्येमुळे ‘व्हर्टिकल डेव्हलपमेंट’ आणि ‘ट्रान्झिट ओरिएंटेड डेव्हलपमेंट’ यांसारख्या आधुनिक संकल्पना अमलात आणत रेल्वे आणि मेट्रो स्थानकांच्या आसपास सोयीसुविधांचे जाळे निर्माण केले जात आहे.