
अखेर ठरलं ! महाराष्ट्र दिनापासून मुंबई-पुणे 'मिसिंग लिंक' होणार खुला; प्रवास होणार अधिक गतिमान
मुंबई : मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक‘ १ मे म्हणजेच महाराष्ट्र दिनापासून खुला होणार आहे. यामुळे मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतूककोंडी आणि खंडाळा घाटातील रखडपट्टी मिसिंग लिंकमुळे टळणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) तब्बल साडेसहा हजार कोटी रुपये खर्च करून १३.५ कि.मी. लांबीचा मिसिंग लिंक बांधला आहे.
देशातील सर्वात लांब बोगदा असणार आहे. या प्रकल्पात एकूण दोन बोगदे असून, त्यातील ९ किमी लांबीचा बोगदा हा देशातील सर्वांत लांब बोगदा ठरणार आहे. तसेच, सर्वांत रुंद बोगदा २३.५ मीटर रुंदीचा असणार आहे. हा बोगदा जगातील सर्वांत रुंद बोगद्यांपैकी एक आहे. हा संपूर्ण मार्ग आठ पदरी असणार आहे. या प्रकल्पांतर्गत १८५ मीटर उंचीचा एक भव्य पूल बांधण्यात आला आहे. तर, १५० मीटर उंचीचा केबल-स्टेड पूल अभियांत्रिकी कौशल्याचा अप्रतिम नमुना ठरला आहे.
या प्रकल्पामुळे प्रवासाचे अंतर ६ किलोमीटरने कमी होईल. यामुळे दररोज प्रवाशांचा ३० मिनिटांचा वेळ वाचेल आणि सुमारे १ कोटी रुपयांच्या इंधनाची बचत होईल. कठीण परिस्थितीत काम पूर्ण झाले असून, आत्तापर्यंत साडेसहा किमीच्या द्रुतगती मार्गाच्या रुंदीकरणाचे काम पूर्ण केले आहे. या मिसिंग लिंक प्रकल्पाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच भेट देत पाहणी केली होती.
महाराष्ट्र दिनी प्रकल्पाचे उद्घाटन
१ मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन होणार आहे. खोपोली ते कुसगावदरम्यान एमएसआरडीसीने २०१८ मध्ये मिसिंग लिंक आणि साडेसहा किलोमीटर लांबीच्या दुतगती मार्गाचे चौपदरीकरणाचा निर्णय घेतला होता. केबल-स्टेड ब्रिजचे काम पूर्ण केले आहे. कठीण भौगोलिक परिस्थितीत हा प्रकल्प पूर्ण केला आहे.
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील बहुप्रतिक्षित ‘मिसिंग लिंक’ हा पायाभूत सुविधा प्रकल्प विस्तारित मुंबई महानगर प्रदेशासाठी (MMR) ‘गेम-चेंजर’ ठरणार आहे. यामुळे “मुंबई ३.०” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उदयोन्मुख कॉरिडॉर्समधील रिअल इस्टेटच्या संभाव्यतेला मोठी चालना मिळणार आहे. सुधारित कनेक्टिव्हिटी, प्रवासाच्या वेळेत झालेली कपात आणि ग्राहकांच्या बदलत्या पसंतीमुळे कर्जत, नेरळ आणि लोणावळा यांसारखी ठिकाणे उच्च-क्षमतेची निवासी आणि ‘सेकंड होम’ गंतव्यस्थाने म्हणून वेगाने प्रकाशझोतात येत आहेत.