ईव्हीएम हॅक आरोपात तथ्य, मी स्वतः इंजिनीअर
मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या दणदणीत विजयानंतर आता विरोधकांकडून ईव्हीएमबाबत शंका उपस्थित केल्या जात आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनीही ईव्हीएमबाबत संशय व्यक्त केला आहे. ‘अनेक ठिकाणी ईव्हीएममध्ये घोटाळा झाल्यामुळे महायुतीच्या जागा निवडून आल्या आहेत. ईव्हीएम हॅक करता येतं. मी स्वतः इंजिनिअर आहे, त्यामुळे मला सगळं माहिती आहे’, असे जानकर यांनी म्हटले आहे.
हेदेखील वाचा : अब्दुल सत्तार यांच्या अडचणींत होणार वाढ; फौजदारी याचिका झाली दाखल, कारण काय तर…
अनेक ठिकाणी ईव्हीएममध्ये घोटाळा झाल्यामुळे महायुतीच्या जागा निवडून आल्या आहेत. ईव्हीएमवर माझा आक्षेप आहे. देशभरात आम्ही याविरोधात आंदोलन करू. ईव्हीएममुळे देशाची लोकशाही धोक्यात आली आहे. ईव्हीएम हॅक करता येतं. मी स्वतः इंजिनिअर आहे. त्यामुळे मला सगळे माहीत आहे. सुप्रीम कोर्ट, निवडणूक आयोग सगळे त्यांचे आहेत. त्यामुळे याला लोकशाही म्हणता येणार नाही. लोकशाहीचा खून करण्याचे काम झाले आहे, असे महादेव जानकर म्हणाले आहेत.
महायुतीचा अनुभव खूप वाईट आला
महादेव जानकर यांनी महायुतीतून बाहेर पडत ‘एकला चलो रे…’ची भूमिका घेतली आहे. त्यावर जानकर म्हणाले, “मला महायुतीचा अनुभव खूप वाईट आला आहे. त्यामुळे मी त्यांच्यापासून दूर आहे. काँग्रेसला अजून चाखल नाही. त्यामुळे त्यांच्याकडे न जाता स्वतंत्र पुढे जायची आमची भूमिका आहे”.
ईव्हीएमवर शरद पवारांनीही व्यक्त केला संशय
ईव्हीएम मशीन हॅक झाल्याचा पुरावा माझ्याकडे नाही. निवडणुकीपूर्वी काहींनी प्रेझेंटेशन दिले होते. अशाप्रकारे मशीन हॅक करणे शक्य असल्याचे सांगण्यात आले. पण आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही ही आमची चूक होती. निवडणूक आयोग अशी चुकीची भूमिका घेईल, असे आम्हाला वाटले नव्हते. या निवडणुकीत हेराफेरी झाल्याचे प्रथमदर्शनी दिसत असल्याचेही त्यांनी सांगितले.
हेदेखील वाचा : मुख्यमंत्री ठरत नसतानाच आता उपमुख्यमंत्रिपदासाठी समोर आली ‘ही’ नावं; महायुतीत खातेवाटपावरून पेच कायम