File Photo : Eknath Shinde
मुंबई : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस असतील याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहे. तरीदेखील मुख्यमंत्रिपदी कोण असणार हे भाजपकडून अद्याप सांगण्यात आलेले नाही. नव्या सरकारमध्ये मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री, असा फॉर्म्युलाही ठरला आहे. त्यामुळे आता उपमुख्यमंत्रिपदासाठी इच्छुकांची नावे समोर आली आहेत.
हेदेखील वाचा : अखेर ठरलं ! राज्यातील महायुती सरकारचा 5 डिसेंबरला होणार शपथविधी; पंतप्रधान मोदीही राहणार उपस्थित
आधी मुख्यमंत्रिपदावरून आणि आता महत्त्वाच्या खात्यांवरून महायुतीत पेच निर्माण झाल्याने निकालानंतर 6 दिवस लोटूनही सरकार स्थापनेला विलंब होत आहे. मुख्यमंत्री कोण होणार?, हे जवळपास निश्चित झाले आहे. नव्या सरकारमध्ये मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री, असा फॉर्म्युलाही ठरला आहे. मुख्यमंत्री भाजपचा तर उपमुख्यमंत्रिपद शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाणार आहे. राष्ट्रवादीकडून अजित पवारच उपमुख्यमंत्री असतील, असे बोलले जात आहे. मात्र, शिवसेनेचा उपमुख्यमंत्री कोण?, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
सूत्रांनुसार, एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपद स्वीकारण्यास तयार नसल्याचे सांगण्यात येत आहे. अशा स्थितीत शिवसेना कुणाच्या खांद्यावर जबाबदारी देणार, याबाबत चर्चा सुरू आहे. शिवसेनेत (एकनाथ शिंदे) उपमुख्यमंत्रिपदासाठी पाच नेत्यांची नावे चर्चेत आहे.
एकनाथ शिंदे कोणावर दाखवणार विश्वास?
शिवसेनेत उपमुख्यमंत्रिपदासाठी एकनाथ शिंदे यांच्या निकटवर्तीय नेत्यांची नावे चर्चेत आली आहेत. यात दीपक केसरकर, भरत गोगावले, गुलाबराव पाटील, उदय सामंत, दादा भुसे यांच्या नावाची चर्चा आहे. दादा भुसे आणि उदय सामंत हे शिंदेंच्या अत्यंत जवळचे मानले जातात. सत्तास्थापनेच्या सर्व महत्वाच्या निर्णयात ते शिंदेसोबत असतात. त्यामुळे शिंदे नेमका कोणावर विश्वास दाखवणार?, याबाबत उत्सुकता आहे.
महायुती सरकारचा संपला कार्यकाळ
विधानसभेचा कार्यकाळ संपल्याने महायुतीकडून राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. दिल्लीत भाजप पक्षश्रेष्ठींसोबत बैठकाही सुरू झाल्या आहेत. दरम्यान, गुरुवारी रात्री अमित शाह यांच्या उपस्थितीत महायुतीच्या तिन्ही प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली.
गृह-नगरविकास खात्यावर भाजपचा दावा
सूत्रानुसार, खातेवाटपामुळे महायुतीच्या सत्ता स्थापनेला मुहूर्त मिळत नसल्याचे चित्र आहे. मुख्यमंत्रिपदाचा घोळ संपल्यानंतर आता गृहमंत्री आणि नगरविकास खात्यावरून रस्सीखेच सुरू आहे. शिवसेनेकडून गृह मंत्रालयावर दावा ठोकण्यात आला आहे. मात्र, भाजपने शिंदेची मागणी फेटाळून लावली आहे. याशिवाय शिंदेंकडे असणारे नगरविकास खात्यावही भाजपने दावा ठोकला आहे.
हेदेखील वाचा : ७ दिवसांत मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली नाही तर..; काय सांगतात नियम अन् राज्यपाल कोणता निर्णय घेऊ शकतात? वाचा सविस्तर