
राजीव गांधी प्राणी संग्रहालयाच्या तिकीट दरवाढीला महापालिकेची मंजुरी; 'असे' असतील नवीन दर
पुणे : कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालय आणि वन्यजीव संशोधन केंद्र आत्मनिर्भर करण्याच्या उद्देशाने तिकिट दरात तब्बल 50 टक्क्यांनी वाढ करण्याच्या प्रस्तावाला शुक्रवारी पुणे महापालिकेच्या स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. प्राणीसंग्रहालयात नवीन प्राणी दाखल होणार असतानाच या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.
महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी सांगितले की, प्राणीसंग्रहालयासाठी महापालिकेकडून होणारा खर्च, मिळणाऱ्या महसुलाच्या तुलनेत अनेक पटीने अधिक आहे. प्राण्यांच्या अन्नाचा खर्च, कर्मचाऱ्यांचे वेतन, देखभाल आणि विस्तार योजनांवर मोठा निधी खर्च होत आहे.
असे असतील नवीन दर
नवीन दरांनुसार प्रौढांसाठी तिकिट 40 रुपयांवरून 60 रुपये, मुलांसाठी 10 रुपयांवरून 20 रुपये करण्यात आले आहे. परदेशी पर्यटकांना 100 ऐवजी 150 रुपये आकारले जातील. खासगी शाळांतील विद्यार्थ्यांना 20 व शासकीय शाळांतील विद्यार्थ्यांना 10 रुपये शुल्क आकारले जाईल. प्राणीसंग्रहालयात लवकरच झेब्रा, माउस डियर, सिंह, माकड, तसेच मर्मोसेट, टॅमरिन आणि जंगली कुत्रे दाखल होणार आहेत. सर्प उद्यानाचे पुनर्विकसनही सुरू आहे.