
Pune Commissioner Naval Kishore Ram Warns Corporators: No Guns Allowed in PMC Premises
पुणे : पाणी पुरवठा करणाऱ्या टॅंकरच्या अपघातांना प्रतिबंध करण्यासाठी महापालिका आता नियमावली (एसओपी ) करणार आहे. तसेच शहरातील गोठे स्थलांतरीत करण्यासाठी मुंढवा येथे दिलेल्या जागांवरील अतिक्रमण दूर करण्यात येणार आहे, अशी माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिली.
स्थायी समितीच्या बैठकीत काही सदस्यांनी नागरी प्रश्नांचा उल्लेख केला. यामध्ये पाण्याच्या टॅंकरमुळे होणाऱ्या अपघातात निष्पाप नागरिकांचा बळी जाणे, केशवनगर-मुंढवा येथील गोठ्याच्या जागेची परस्पर विक्री, अनधिकृत होर्डिंग आदी विषयांचा समावेश होता. या प्रश्नांवर आयुक्त नवल किशोर राम यांनी उत्तर देताना योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले. यासंदर्भात भिमाले यांनी पत्रकार परीषदेत माहिती दिली.
शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या गाई आणि म्हशींचे गोठे स्थलांतरित करण्यासाठी व्यावसायिकांना मुंढवा-केशवनगर भागात जागा देण्यात आल्या होत्या. त्या गोठ्यांचे अद्याप स्थलांतर झाले नाही. ही सर्व प्रक्रिया आरोग्य विभागामार्फत राबविली गेली. परंतु या दिलेल्या जागेवर गोठ्यांचे स्थलांतर झाले नाही, तेथे बांधकाम करून त्या जागांची विक्री होत असल्याकडे काही नगरसेवकांनी लक्ष वेधले. याविषयावर पुढील कारवाई केली जाईल, असेही प्रशासनाने नमूद केले.
नगरसेविका कालिंदा पुंडे यांनी पाणी पुरवठा करणाऱ्या टॅंकरच्या अपघाताच्या वाढत्या प्रमाणावर चिंता व्यक्त केली. याविषयावर आयुक्त नवल किशोर राम यांनी महापालिकेकडून केला जाणाऱ्या पाणी पुरवठा करणाऱ्या टॅंकर व्यावसायिकांसाठी नियमावली तयार केली जाईल. सदर टॅंकर चालकाच्या वाहन चालविण्याचा परवाना, टॅंकरच्या होणाऱ्या फेऱ्या, आदी विषयीची माहिती गोळा करण्यासाठी या नियमावलीचा उपयोग होईल. तसेच या टॅंकरसाठी ‘स्काडा’ यंत्रणा बसवणे बंधनकारक केले जाईल, यामुळे टॅंकर व्यावसायिकांकडून होणाऱ्या गैरप्रकारांना आळा बसेल.
नगरसेविका बनकर यांनी मांडला विषय
नगरसेविका वैशाली बनकर यांनी अनधिकृत होर्डिंगच्या संदर्भातील विषय मांडला. यावर स्थायी समितीने प्रशासनाला अनधिकृत होर्डिंगची संपूर्ण माहिती सादर करण्याच्या सुचना केल्या. तसेच उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार होर्डिंग व्यावसायिकांकडून शुल्क आकारणी करावी अशी सुचनाही केली गेली. त्यानुसार शहरात किती अधिकृत आणि अनधिकृत होर्डिंग आहे, कारवाई काय केली याची माहीती सादर केली जाईल असे आयुक्तांनी नमूद केले.
पालखी विठोबा मंदिर परिसरासाठी 10 कोटींचा निधी
आषाढी वारीसाठी पुण्यात दाखल होणारा पालखी सोहळ्यात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरात मुक्कामी असतो. परंतु यावर्षी हे मुक्कामाचे ठिकाण बदलण्याची चर्चा सुरु झाली आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून सदर मंदिर परिसरात सुविधा निर्माण करण्यासाठी दहा कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव मंजुर केला गेला. या मंदिर परीसरात काही जागा ताब्यात घेऊन त्या ठिकाणी सुविधा उपलब्ध करून देण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे. पालखी सोहळा मार्गाच्या रस्त्याची देखभाल दुरुस्ती केली जाणार आहे, असे भिमाले यांनी नमूद केले. पालखी सोहळ्याचे मुक्कामाचे स्थळ बदलू नये अशी विनंती आम्ही आळंदी देवस्थानच्या ट्रस्टींना केली आहे, असेही त्यांनी सांगितले.