नागपूर : नागपुरात भर दिवस फ्लॅटमध्ये दरोडा घातल्याची घटना पुढे आली आहे. नागपुरतील बजाज नगर सारख्या गजबजलेल्या परिसरात दुपारी घडलेल्या या घटनेने संपूर्ण नागपुरात खळबळ माजविली आहे. फ्लॅटला कुलूप लावलेले पाहून ते दोघे जण घरात शिरले होते. घर बंद असल्यामुळे आत कुणीच नसेल, या संधीचा फायदा घ्यावा असे त्यांना वाटले. मात्र, कुलूपबंद फ्लॅटमध्ये अचानक त्यांच्यासमोर २३ वर्षीय युवती येऊन उभी राहिली. त्यामुळे दोघे क्षणभर बिथरले. नंतर, त्यांनी तिच्यावर बंदूक ताणत तिला बंदुकीचा धाक दाखवत घरातील सामान चोरायला सुरुवात केली. त्या दोन दरोडेखोरांनी तब्बल अडीच लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केल्याचे समोर आले आहे.
[read_also content=”दोन महिन्यांचा पगार न देणे मालकास पडले महाग….. नोकरानेच केली चोरी, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद https://www.navarashtra.com/nagpur/vidarbha/nagpur/non-payment-of-two-months-salary-is-costly-to-the-employer-nraa-230784.html”]
बजाज नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत उज्ज्वला अपार्टमेंट आहे. दुपारी फ्लॅटला कुलूप लागलेले पाहून दोन आरोपींनी कुलूप तोडून फ्लॅटमध्ये प्रवेश केला. मात्र फ्लॅटमध्ये २३ वर्षीय युवती होती. मुलगी घरात झोपली असल्याने आई बाहेर जातांना फ्लॅटला बाहेरून कुलूप लावून गेली होती. घरात कुणीच नसल्याचा विचार करून ते घरात गेले. ती युवती घरात असल्याने तिला धाक दाखवत त्यांनी तिच्याकडून घरातील लॉकरच्या चाव्या घेत सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा मुद्देमाल चोराला. आणि ते पसार झाले. तर, पोलिसांनी आता आरोपींचे स्केच तयार करून घेतले असून त्या आधारावर त्यांचा शोध सुरू केला आहे. या दरोड्याचा घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून आता सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न चिन्ह उपस्थित झाले आहे.