मुंबई जिल्हा बँकेची निवडणूक महायुती एकत्र लढणार!
मुंबई : मुंबई जिल्हा बँकेच्या निवडणुकीआधी राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापायला सुरुवात झाली आहे. शिवसेना शिंदे गट ही निवडणूक स्वबळावर लढणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. मात्र आता या चर्चांना पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे. याबाबत मोठी बातमी समोर आली असून पुरंदर बंगल्यावर दिग्गज नेत्यांनी उपस्थिती लावली असून राजकीय खलबतं पार पडत आहेत. (Mumbai Bank Election)
उपसभापती सचिन अहिर यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या पुरंदर बंगल्यावर महायुतीच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडत आहे. या बैठकीला सचिन अहिर, मंत्री उदय सामंत, भाजप नेते प्रवीण दरेकर, सिद्धार्थ कांबळे आणि शिवाजीराव नलावडे यांची उपस्थिती होती.
मुंबई जिल्हा बँकेची निवडणूक एकत्रितपणे लढवण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली. सुरुवातीला शिंदे गट स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. मात्र आता मुंबई जिल्हा बँकेची निवडणूक महायुती म्हणूनच लढवण्यावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे निवडणुकीच्या आधीच महायुतीने आपली रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे.
महायुती एकत्र निवडणूक लढवणार हे जवळपास स्पष्ट झालं असलं तरी खरी अडचण आता जागावाटपावरून निर्माण होण्याची शक्यता आहे. कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार, यावर अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही.
यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात चर्चा होऊन अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती आहे. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात मुंबई जिल्हा बँकेची निवडणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी काही दिवसांत जागावाटपाचं चित्र स्पष्ट होऊ शकतं.
दुसरीकडे सातारा जिल्हा बँकेच्या राजकारणात मात्र भाजपला मोठा धक्का बसला आहे. शंभुराज देसाई यांच्या राजकीय खेळीमुळे भाजपच्या हातातून अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची संधी निसटली. बँकेच्या 21 सदस्यांपैकी बहुमतासाठी 12 मतांची गरज होती. भाजपकडे सर्वाधिक 9 सदस्य होते. तर शिवसेना शिंदे गटाकडे 4 आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे 8 सदस्य होते. शंभुराज देसाई यांनी राष्ट्रवादीच्या 8 आणि शिंदे गटाच्या 4 सदस्यांची मोट बांधली. त्यामुळे 12 सदस्यांचं बहुमत तयार झालं. परिणामी राष्ट्रवादी अजित पवार गटाला अध्यक्षपद, तर शिवसेना शिंदे गटाला उपाध्यक्षपद मिळालं.
एकीकडे मुंबईत महायुतीची एकजूट दिसत असताना साताऱ्यात भाजपला सत्तेपासून दूर राहावं लागलं आहे. त्यामुळे सहकार क्षेत्रातील या निवडणुकांचे राजकीय पडसाद आगामी काळातही उमटण्याची शक्यता आहे.
Mahayuti Politics: महायुतीत मोठी फूट; काँग्रेससोबत हात मिळवत शिंदे गट-राष्ट्रवादीचा भाजपला धक्का
Ans: मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई जिल्हा बँकेची निवडणूक महायुती एकत्रितपणे लढवणार आहे. यामध्ये भाजप आणि शिवसेना शिंदे गटासह महायुतीतील घटक पक्ष सहभागी होणार आहेत.
Ans: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जागावाटपाबाबत अंतिम निर्णय घेणार असल्याची माहिती आहे.
Ans: सातारा जिल्हा बँकेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा अध्यक्ष, तर शिवसेना शिंदे गटाचा उपाध्यक्ष झाला. या राजकीय समीकरणामुळे भाजपला दोन्ही पदांपासून दूर राहावं लागलं.






