
फोटो सौजन्य सोशल मीडिया
नागपूर , क्राईम रिपोर्टर. दररोजप्रमाणे मॉर्निंग वॉक झाला. एलएडी चौकातील टपरीवर मित्रांसोबत चहाचा घोट घेत गप्पा रंगल्या होत्या. काही क्षणातच काळाने झडप घातली. एसटी महामंडळाच्या बसने दूधवाहू वाहनाला धडक दिली. यात दूधवाहू वाहन थेट टपरीजवळ उभ्या असलेल्या तिघांवर उलटले. यात एकाचा मृत्यू तर तिघे गंभीर जखमी झाले, पोलिसांनी एसटी बसचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सुनील आनंदराव जाधव (६५) असे मृताचे नाव आहे. जखमी सुनील कुशालराव गुडदे (६२), शैलेंद्र मारोतराव किनगावकर (६२) आणि दूधवाहू वाहनाचा चालक अभिषेक दुर्गाप्रसाद जगणे (२३) यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी सुमारे ६.४० वाजता एमएच-३१ जीडी-०५८५ क्रमांकाचे दूधवाहू वाहन रामनगरकडून अभ्यंकरनगरच्या दिशेने जात होते.
Vishwas Nangare Patil: वाहतूक पोलिसांना आता ‘सर्व्हिस गन’ बाळगणे बंधनकारक; पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांचा मोठा निर्णय
रोजची भेट… आज कायमची तुटली
सुनील जाधव, सुनील गुडदे आणि शैलेंद्र किनगावकर हे तिथेही दररोज सकाळी एकत्र फिरायला जात असत. त्यानंतर एलएडी चौकातील त्याच टपरीवर चहा घेत दिवसाची सुरुवात करणे हा त्यांचा अनेक वर्षांचा नित्यक्रम होता. मंगळवारीही ते नेहमीप्रमाणे भेटले. मात्र, काही क्षणातच भीषण अपघाताने त्यांच्या मैत्रीच्या या रोजच्या भेटीला कायमचा विराम दिला.
एलएडी चौकात वळण घेताना शंकरनगर चौकाकडून अंबाझरी टी-पॉइंटकडे जाणाऱ्या इमामवाडा आगाराच्या एसटी बस क्र. एमएच-४० वाय-५१२७ च्या चालकाने धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, दूधवाहू वाहन चौकातील चहाच्या टपरीजवळ उभ्या असलेल्या तिघांच्या अंगावर उलटले आणि वाहनाखाली दाबून सुनील जाधव यांचा मृत्यू झाला . तर तिघे जखमी झाले .
Nagpur : नागपूरच्या उद्यानात धक्कादायक प्रकार; मनपाच्या उद्यानात चक्क गांजाची झाड
मनपाचे निवृत्त महसूल निरीक्षक
सुनील जाधव महानगरपालिकेत महसूल निरीक्षक म्हणून कार्यरत होते. निवृत्तीनंतर ते कॉर्पोरेशन कॉलनी येथे पत्नी ज्योती यांच्यासह राहत होते. त्यांच्या पत्नीही महानगरपालिकेत कार्यरत होत्या. त्यांची मुलगी शिवानी मुंबईत नोकरी करते. वडिलांच्या अपघाती निधनाची बातमी मिळताच ती तातडीने नागपूरकडे रवाना झाल्याची माहिती आहे. घटनेच्या वेळी जवळच नाश्ता करीत असलेल्या तीन डॉक्टरांनी तत्काळ धाव घेत जखमींना खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, सुनील जाधव यांना वाचवण्यात डॉक्टरांना यश आले नाही.